अखेर ‘कृषी जैवतंत्रज्ञान’ला लवकरच प्राध्यापक मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:11 PM2018-06-11T22:11:05+5:302018-06-11T22:11:20+5:30
येथील वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाला दोन वर्षांपासून असलेली प्राध्यापकांची प्रतीक्षा संपणार आहे. येत्या महिनाभरात तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मुलाखती घेऊन नेमणुका केल्या जातील, अशी स्पष्टोक्ती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाला दोन वर्षांपासून असलेली प्राध्यापकांची प्रतीक्षा संपणार आहे. येत्या महिनाभरात तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मुलाखती घेऊन नेमणुका केल्या जातील, अशी स्पष्टोक्ती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी दिली.
विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय संपूर्ण विदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यासाठीच येथे तज्ज्ञ प्राध्यापक असण्याची गरज आहे. परंतु, सध्या विद्यापीठाने येथे अकरा महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यामुळेच प्राध्यापक नेमणुकीची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे. महिनाभरात मुलाखती घेऊन नेमणुका होणार आहे. प्रवेशक्षमता वाढविण्याचा प्रस्ताव विद्यापीठाकडे आला आहे का, या प्रश्नावर कुलगुरू डॉ. भाले म्हणाले, सध्याच तसा काही प्रस्ताव नाही. प्रवेश क्षमता वाढविण्याचा सध्याच काही विचार नाही. अभ्यासक्रम गेल्यावर्षी प्रमाणेच सुरू राहतील.
शास्त्रज्ञांनो, बोंडअळी रोखा
कृषी विद्यापीठातर्फे येथील कृषी विज्ञान केंद्रात सोमवारी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक झाली. यात कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी विदर्भातील कृषी शास्त्रज्ञांकडून बोंडअळीबाबत आढावा घेतला. गेल्या वर्षी जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टरवर बोंडअळीने नुकसान झाल्याची माहिती यावेळी कुलगुरूंपुढे ठेवण्यात आली. या हंगामात ठोस पावले उचलून विदर्भातून बोंडअळीला हद्दपार करा, असे निर्देश कुलगुरूंनी शास्त्रज्ञांना दिले.