अखेर बीडीएस प्रणाली केली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:20 AM2021-06-29T04:20:14+5:302021-06-29T04:20:14+5:30
आमगाव : वित्त विभागाने मागील काही महिन्यांपासून बीडीएस प्रणाली बंद करून ठेवल्याने तत्काळ बीडीएस प्रणाली ...
आमगाव : वित्त विभागाने मागील काही महिन्यांपासून बीडीएस प्रणाली बंद करून ठेवल्याने तत्काळ बीडीएस प्रणाली सुरू करा अन्यथा बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने वेतन पथक कार्यालयामार्फत २१ जून रोजी देण्यात आला होता. नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा केला. याची दखल घेत शासनस्तरावर बंद करून ठेवलेली बीडीएस प्रणाली सुरू करण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह गुणेश्वर फुंडे यांनी दिली.
मागील काही महिन्यांपासून शासनस्तरावर बीडीएस प्रणाली बंद करून ठेवल्याने राज्यातील शिक्षक-कर्मचाऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत होता. बीडीएस प्रणाली बंद करून ठेवल्याने राज्यातील शिक्षक-कर्मचाऱ्यांना आजाराच्या उपचाराकरिता तसेच आपल्या पाल्यांच्या उच्चशिक्षणाकरिता, लग्नाकरिता इतकेच नव्हे तर सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीच्या फायनल विड्रॉलची रक्कम, मरण पावलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना सुध्दा त्यांच्या हक्काची रक्कम मिळू शकत नव्हती. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हास्तरावर वेतन पथक कार्यालयात प्रलंबित होते. यामुळे त्यांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झालेली होती. याची दखल घेत ८ दिवसांत बीडीएस प्रणाली सुरू करा अन्यथा बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला होता. याची दखल घेत अखेर बीडीएस प्रणाली सुरू करण्यात आली असून यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी अग्रीम काढण्याचा व सेवानिवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या फायनल विड्राॅल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल शिक्षक परिषदेचे छत्रपाल बिसेन, घनश्याम पटले, भैयालाल कनोजे, रतीराम डोये, ओमप्रकाशसिंह पवार, विजय मानकर, वीरेंद्र राने, उल्हास तागडे, मधुकर चौधरी, आतीश ढाले, प्रभाकर कावळे, उमेश कापगते, प्रेमलाल सेवईवार, यशवंत गौतम, प्रदीप मेश्राम, गुलाब नेवारे, आनंद बिसेन, राजेंद्रसिंह तोमर, मुरलीधर करंडे, प्रेमलता ठाकरे, वैजयंती पेशकर, भागवत बडोले, भोजराज मेंढे, भोजराज फुंडे, के.सी.सरजारे आदिंनी आनंद व्यक्त केला.