अखेर निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 05:00 AM2021-03-07T05:00:00+5:302021-03-06T23:30:28+5:30
तालुक्यात सिंचन क्षेत्रात धडाक्याने कामे सुरू आहेत. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-१ चे पाणी खळबंदा जलाशयात सोडून लाभक्षेत्रात १०१७१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. त्याचबरोबर धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ करिता २९० कोटी रुपये फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत मंजूर करवून २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जलपूजन करून पाईपलाईनच्या कामाला सुरुवात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तालुक्यात सिंचन क्षेत्रात मोठी क्रांती होत असतानाच त्यात आता भर घालणाऱ्या निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाला वन्यजीव विभागाची मंजुरी मिळाली आहे. यामुळे येत्या ६ महिन्यांत या प्रकल्पाचे काम सुरू होणार असून धापेवाडा उपसा सिंचन टप्पा- १ व २ सोबतच निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाद्वारे १८ गावांतील ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
तालुक्यात सिंचन क्षेत्रात धडाक्याने कामे सुरू आहेत. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-१ चे पाणी खळबंदा जलाशयात सोडून लाभक्षेत्रात १०१७१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. त्याचबरोबर धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ करिता २९० कोटी रुपये फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत मंजूर करवून २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जलपूजन करून पाईपलाईनच्या कामाला सुरुवात आली. आतापर्यंत ८० टक्के काम प्रगतीवर असून त्याचबरोबर भुराटोला लघु मध्यम प्रकल्पाकरिता २१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
यामध्ये सन १९७२ पासून २००६ पर्यंत निमगाव येथील आंबेनाला येथे प्रकल्पाला सुरू करण्याकरिता अनेक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. आमदार विजय रहांगडाले यांनी सन २०१५ पासून टप्याटप्प्याने निमगाव प्रकल्पाला मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला.
महाराष्ट्र शासनाद्वारे वन्यजीव विभागाच्या प्रकल्पाकरिता लागणाऱ्या जमिनीचा ३१ कोटींचा एफआरए निधी शासनास भरणा करण्यात आला. हा प्रकल्प नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असल्यामुळे १० किलोमीटर अंतरातील प्रकल्पास वन्यजीव मंडळाच्या मंजुरीकरिता मे २०२० मध्ये पाहणी करून ११ फेब्रुवारी २०२० रोजी ३१.७१ लक्ष व १६ फेब्रुवारी २०२१ रोजी १२.९२ लक्ष रुपये असे एकूण ४४.६३ लक्ष प्रकल्प यंत्रणेस भरण्यात आले आहे.
वन्यजीव विभागाच्या मंजुरीच्या सर्व बाबी पूर्ण झाल्याने व या प्रकल्पाकरिता नाहरकत मिळाल्याने हा प्रकल्प येत्या ६ महिन्यांत सुरू होणार आहे. यामुळे धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-१ व २ सोबतच निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाद्वारे १८ गावांतील ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.