अखेर कोरोना विमा संरक्षणाची मुदत जूनपर्यंत वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:28 AM2021-05-16T04:28:05+5:302021-05-16T04:28:05+5:30
गोंदिया: कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावित असताना कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण कवचाची मुदत पोलीस पाटील संघटनेच्या सतत पाठपुराव्यानंतर ...
गोंदिया: कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावित असताना कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण कवचाची मुदत पोलीस पाटील संघटनेच्या सतत पाठपुराव्यानंतर अखेर जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आली. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे वित्त विभाग, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खा. प्रफुल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे म.रा. गाव कामगार पोलीस पाटील संघाच्यावतीने आभार मानले.
आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, मानसेवी पोलीस पाटील सह सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध चाचणी, उपचार व मदत कार्यात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या सर्व प्रकरणी ५० लक्ष रुपयाच्या विमा संरक्षणाची मुदत डिसेंबर २०२० पर्यंत होती. परंतु त्यानंतर राज्यात कोरोना संक्रमणाची लागण दुपटीने होऊनसुद्धा विमा संरक्षणाची मुदत वाढविण्यात आलेली नव्हती. या दरम्यान वर्ष २०२० ला २० पोलीस पाटील व वर्ष २०२१ ला आजपर्यंत १७ पोलीस पाटील मृत्युमुखी पडले. त्यामुळे म.रा. गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्यावतीने सतत गृह मंत्रालय, खा. प्रफुल पटेल व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला. त्यांनी वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. १४ मे २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार विमा संरक्षणाची मुदत जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आली. या दरम्यान कोरोना संक्रमित झालेल्या पोलीस पाटलांवर सर्व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा झालेला वैद्यकीय खर्च शासनाने देण्याची तरतूद करावी व विमा संरक्षणाची मुदत डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवावी, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेनी केली होती. शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंपराज परशुरामकर, दिलीप मेश्राम गोंदिया, शरद ब्राम्हणवाडे गडचिरोली, सुधाकर साठवणे भंडारा, विजय घाडगे नागपूर व राजेश बन्सोड, श्रीराम झिंगरे, नंदा ठाकरे, रमेश टेंभरे यांनी केले आहे.