अखेर झाली तंमुस अध्यक्षाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:43 PM2018-01-01T23:43:08+5:302018-01-01T23:43:58+5:30
येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवड सभेत दोन गटांच्या चर्चेअंती गुप्तमतदान पद्धतीने रविवारी (दि.३१) रात्री उशिरापर्यंत निवडणूक घेण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
बोंडगावदेवी : येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवड सभेत दोन गटांच्या चर्चेअंती गुप्तमतदान पद्धतीने रविवारी (दि.३१) रात्री उशिरापर्यंत निवडणूक घेण्यात आली. रात्री ११.३० वाजता मतमोजणी प्रक्रिया संपल्यानंतर सभाध्यक्षांनी प्रमोद पाऊलझगडे बहुमताने विजयी झाल्याचे घोषित केले.
येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाची निवड ४ महिन्यांपूर्वी घेण्यात आली होती. त्यात त्यावेळच्या ग्रामसभा अध्यक्षांनी प्रमोद पाऊलझगडे यांची निवड झाल्याचे घोषित केले होते. त्याचवेळी शर्यतीमधील अध्यक्षपदाचे उमेदवार पुंडलिक भैसारे यांनी आक्षेप घेवून चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे सदर निवड वाद्यांत आली होती. पंचायत समितीच्या वतीने प्रकरणाची शहनिशा करुन ३० आॅगस्ट २०१७ रोजी घेण्यात आलेली तंमुस अध्यक्षाची निवड शासन निर्णयाप्रमाणे घेण्यात आली नसल्यामुळे झालेली निवड वैध कसे म्हणता येईल, असा अभिप्राय गट विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी आपल्या ११ आॅक्टोबर २०१७ च्या चौकशी अहवालात नमूद केले होते. त्याचप्रमाणे जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी १४ नोव्हेंबर २०१७ च्या पत्रात ग्रामपंचायत बोंडगावदेवी येथील तंमुस अध्यक्षाची निवड नियमानुसार झालेली नसल्यामुळे ग्रामसभा बोलावून शासन निर्णयाप्रमाणे निवडणूक घ्यावी, असे निर्देश दिले होते.
वरिष्ठांच्या आदेशान्वये अखेर ग्रामपंचायतला नव्याने तंमुस अध्यक्षाची निवड करण्यासाठी विशेष ग्रामसभा घ्यावी लागली. ३० डिसेंबरला बाजार चौकात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच राधेशाम झोळे होते. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या १/३ सभासद निवड करणे, या एकमेव विषयावर ग्रामसभा घेण्यात आली. सभेला गावातील १४२२ महिला-पुरुष उपस्थित होते. तसेच विशेष निरीक्षक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनुपकुमार भावे उपस्थित होते. सभेत शांतता रहावी म्हणून पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सभेत प्रमोद पाऊलझगडे व पुंडलिक भैसारे या दोघांची नावे समोर आली. शेवटपर्यंत दोघेही तटस्थ असल्याने ग्रामसभा अध्यक्षांनी हातवर करुन मतदान घेण्याची तयारी दर्शविली. त्यावर पुंडलिक भैसारे यांच्या समर्थकांनी आक्षेप घेवून लेखी निवेदनातून लोकशाही पद्धतीने गुप्त मतदान घेवून निवड करावी, अशी भूमिका घेतली. चर्चेअंती गुप्त मतदान प्रक्रियेला तयार झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
ग्रामसभेला नोंद झालेल्या ग्रामस्थांपैकी १२६६ गावकºयांनी मतदान केले. यात प्रमोद पाऊलझगडे यांना ८३० मते तर पुंडलिक भैसारे यांना ४०८ मते पडली. २८ मते अवैध ठरली. सभाध्यक्षांनी प्रमोद पाऊलझगडे यांचा विजय झाल्याचे जाहीर केले. निवड प्रक्रिया रात्री ११.३० वाजेपर्यंत चालली.
पाऊलझगडे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करू विजयोत्सव साजरा केला. भैसारे यांच्या समर्थकांनी त्यांना बाहेर येवू देताच पुष्पहार घालून अपेक्षेपेक्षा जास्त मतदान घेतल्याने त्यांचे स्वागत केले. भैसारे यांच्या समर्थकांनी गुप्त मतदान झाल्याने समाधान व्यक्त केले. निवडणूक प्रक्रियेसाठी सरपंच राधेश्याम झोळे, ग्रामसेवक ब्राम्हणकर, निरीक्षक अनुपकुमार भावे व कर्मचाºयांनी सहकार्य केले.