अखेर धान खरेदीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 05:00 AM2022-07-04T05:00:00+5:302022-07-04T05:00:06+5:30
राज्य शासनाच्या कृषी विभागाने केंद्राला पेरणी संदर्भातील चुकीची आकडेवारी दिली होती. सुरुवातीला राज्य शासनाने संपूर्ण राज्याचे पेरणी क्षेत्र ५६०८ हेक्टर पाठविले होते. त्यापैकी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पेरणीचे क्षेत्र ४०३२५ हेक्टर दिल्याने केंद्राने राज्य शासनाला १५ लाख क्विंटलचे उद्दिष्ट दिले. ते पूर्ण झाल्यानंतर भंडारा-गोंदियाच्या कृषी विभागाने मे महिन्यात १०७१२८ हेक्टर लागवडीचा अहवाल पाठवला. या आधारे राज्याला २७६०००० क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उद्दिष्ट पूर्ण झाल्याने मागील १५ दिवसांपासून धान खरेदी बंद असल्याने चिंताग्रस्त असलेल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाने राज्य शासनाच्या रब्बी धान खरेदीचे उद्दिष्ट पुन्हा एकदा वाढवून दिले असून या संदर्भातील आदेश २ जुलै रोजी काढण्यात आले आहेत. खासदार सुनील मेंढे यांच्या सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याचे हे फलित असून उद्यापासून पुन्हा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी सुरू होणार आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागाने केंद्राला पेरणी संदर्भातील चुकीची आकडेवारी दिली होती. सुरुवातीला राज्य शासनाने संपूर्ण राज्याचे पेरणी क्षेत्र ५६०८ हेक्टर पाठविले होते. त्यापैकी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पेरणीचे क्षेत्र ४०३२५ हेक्टर दिल्याने केंद्राने राज्य शासनाला १५ लाख क्विंटलचे उद्दिष्ट दिले. ते पूर्ण झाल्यानंतर भंडारा-गोंदियाच्या कृषी विभागाने मे महिन्यात १०७१२८ हेक्टर लागवडीचा अहवाल पाठवला. या आधारे राज्याला २७६०००० क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले.
दोन्ही वेळा राज्य शासनाने केंद्राला चुकीचा अहवाल दिल्याने धान खरेदीचे उद्दिष्ट कमी मिळाले. त्यामुळे धान खरेदी बंद झाली. यामुळे धान विकल्या न गेल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची होत असलेली तगमग पाहून खासदार मेंढे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून उद्दिष्ट वाढवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश येत अखेर शनिवारी (दि.२) केंद्र शासनाने पत्र काढीत राज्याचे धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिल्याचे स्पष्ट केले. २७ लाख क्विंटलवरून आता हे उद्दिष्ट ४६ लाख क्विंटल करण्यात आले आहे. त्यामुळे आता बंद पडलेली धान खरेदी उद्यापासून सुरू होणार आहे.
मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांची होणार सोय
- केंद्र शासनाने जिल्ह्यातील धान खरेदीचे उद्दीष्ट वाढवून देत धान खरेदीला मुदतवाढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांची ऐन हंगामात सोय होणार आहे. जुन्या आदेशानुसार उद्दीष्ट पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील धान खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे हजारो क्विटंल धान अद्याप पडून असल्याचे त्यांची अडचण झाली होती. धान विकला न गेल्याने त्यांच्या हाती पैसा नव्हता व त्यात खरिपात काय करावे असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र केंद्र शासनाने संपूर्ण परिस्थिती जाणून घेत जिल्हयातील धान खरेदीचे उद्दीष्ट वाढवून दिले. शिवाय धान खरेदीला मुदतवाढ दिल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडील धान विकून हाती पैसा येणार. अशात त्यांना खरिपात येत असलेली अडचण सुटणार व खरिपातही चांगले उत्पादन घेता येणार आहे.