अखेर त्या हॉट मिक्स प्लांटच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 08:54 PM2019-05-12T20:54:08+5:302019-05-12T20:54:41+5:30
तालुक्यातील सोमलपूर गंगेझरी येथील गट क्रं.१६ मध्ये भिवखिडकी सिरेगाव तलावाजवळ सुरु असलेल्या हॉट मिक्स प्लांटमुळे पर्यावरण धोक्यात आले होते. या प्लांटमुळे अवैध उत्खनन केले जात असल्याची तक्रार जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील सोमलपूर गंगेझरी येथील गट क्रं.१६ मध्ये भिवखिडकी सिरेगाव तलावाजवळ सुरु असलेल्या हॉट मिक्स प्लांटमुळे पर्यावरण धोक्यात आले होते. या प्लांटमुळे अवैध उत्खनन केले जात असल्याची तक्रार जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केली होती. त्याचीच दखल घेत अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार यांनी या प्लांटची चौकशी करण्याचे निर्देश नायब तहसीलदार एम.यू.गेडाम यांना दिले आहे.
तहसीलदारांनी दिलेल्या आदेशात त्या परिसरात असलेली गिट्टीची साठवणूक व परवानगी पत्र यासंदर्भात सविस्तर चौकशी करण्याचे निर्देशही नायब तहसीलदारांना दिले आहे. त्यामुळे आता हॉट मिक्स प्लांटवर कोणती कारवाई होणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सिरेगाव तलावाजवळ हॉट मिक्स प्लांट सुरु करण्यात आला असून प्रदूषण महामंडळाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. यामुळे पर्यावरणाला सुध्दा धोका निर्माण झाला होता.
हॉट मिक्स प्लांटला लागून तलाव व जंगल आहे. त्यामुळे परिसरात वन्यप्राणी व जैवविविधता पहावयास मिळते. मात्र, प्लांटमधून निघणारा धूळ, प्लांटमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ये-जा प्लांटमधून होणारे ध्वनी प्रदूषण यामुळे परिसरातील तलावात वास्तव करणारे विदेशी पक्षी, वन्यप्राणी यांना सुध्दा धोका निर्माण झाला होता.
यासंदर्भात जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. दरम्यान हॉट मिक्स प्लांटवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. तहसीलदार यांनी स्थानिक तलाठ्याकडून प्लांटची सर्व माहिती घेतली. प्लांट परिसरात अंदाजे ३०० ब्रास काळी गिट्टी पडून आहे. त्याचे वाहतूक परवाना गोंदिया येथील एका आॅफीसमध्ये जमा केल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सोमलपूर ग्रामपंचायतीकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतले असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकरणाची घटनास्थळी जाऊन चौकशी करावी व तसा अहवाल सादर करण्याचे आणि संबंधितांकडे परवाना नसलेल्या सर्व साहित्याची जप्ती करण्याचे निर्देश नायब तहसीलदार एम.यू.गेडाम यांना दिले आहे.