तीन महिन्यांनंतर अखेर निघाला जि. प. गोंदियाच्या अध्यक्ष निवडणुकीचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 01:05 PM2022-04-26T13:05:48+5:302022-04-26T13:12:36+5:30

या निवडणुकीला घेऊन मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेलासुद्धा आता विराम लागला आहे.

finally the date of Zilla Parishad gondia President election has decided | तीन महिन्यांनंतर अखेर निघाला जि. प. गोंदियाच्या अध्यक्ष निवडणुकीचा मुहूर्त

तीन महिन्यांनंतर अखेर निघाला जि. प. गोंदियाच्या अध्यक्ष निवडणुकीचा मुहूर्त

Next
ठळक मुद्दे१० मे रोजी होणार निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूच

गोंदिया : मागील तीन महिन्यांपासून लांबलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीचा मुहूर्त अखेर निघाला असून, १० मे रोजी अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. यासंबंधीची अधिसूचना जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी सोमवारी (दि. २५) जारी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीला घेऊन मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेलासुद्धा आता विराम लागला आहे.

कोरोनामुळे दीड वर्ष लांबलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०१२ मध्ये घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षण रद्द केल्याने दोन टप्प्यांत ही निवडणूक पार पडली. १८ जानेवारीला निवडणूक आणि १९ जानेवारीला दोन्ही टप्प्यांत झालेल्या मतदानाची मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतरच १५ दिवसांत अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती पदासाठी निघालेले पूर्वीचेच आरक्षण कायम ठेवायचे की नव्याने आरक्षण काढायचे, यावर जिल्हा निवडणूक विभागाने ग्रामविकास मंत्रालयाचे मार्गदर्शन मागविले होते. मात्र, यासाठी ग्रामविकास विभागाने तब्बल तीन महिने लावले. त्यामुळे निवडून आलेल्या भाजपच्या २६ सदस्यांनी ५ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

यावर २२ एप्रिल रोजी न्यायालयाने शासन आणि निवडणूक विभागाला ७ जून पूर्वी अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करा, असे मौखिक आदेश दिले. त्यानंतर सोमवारी (दि. २५) जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी जि. प. अध्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाची अधिसूचना जारी केली. त्यात १० मे रोजी यासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना विराम लागला आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

१० मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारणे, दुपारी ३ वाजता विशेष सभेला सुरुवात,

             दुपारी ३.१५ वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी,

             दुपारी ३.३० वाजता उमेदवारी अर्ज मागे घेणे,

             दुपारी ४ वाजता आवश्यक असल्यास मतदान.

असे जि. प. तील पक्षीय बलाबल

एकूण सदस्य संख्या : ५३

भाजप : २६

काँग्रेस : १३

राष्ट्रवादी : ८

चावी : ४

अपक्ष : २

जि. प. चा ९ वा अध्यक्ष कोण?

भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन १ मे १९९९ ला गोंदिया जिल्हा परिषदेची निर्मिती झाली. त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेची सन २००० मध्ये निवडणूक पार पडली. त्यानंतर जि. प. पहिले अध्यक्ष म्हणून ॲड. कृष्णकुमार शेंडे यांची निवड करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत एकूण ८ अध्यक्ष झाले असून, १० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत जि. प. चा ९ वा अध्यक्ष मिळणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागले आहे.

वर्धानंतर नागपूरच्या बैठकीत होणार नावावर शिक्कामोर्तब

जिल्हा परिषदेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता, भाजपचा सर्वात मोठा पक्ष आहे. दोन अपक्ष सदस्यांच्या मदतीने भाजपला जि. प. मध्ये सत्ता स्थापन करणे सहज शक्य आहे. त्यासाठी त्यांनी हालचाली सुद्धा सुरू केल्या आहेत. भाजपच्या वरिष्ठ सदस्यांची एक बैठक वर्धा येथे पार पडली. या बैठकी गोंदिया जि. प. अध्यक्षाचे नाव ठरविण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्यानंतर अंतिम बैठक नागपूर येथे होणार असून, त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीचे अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती आहे.

कॉँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा सूर जुळेना

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अजूनही कसलीच चर्चा झालेली नाही. हे दोन पक्ष एकत्र आल्यास आणि त्यांना अपक्ष आणि चावीच्या सदस्यांची साथ मिळाल्यास सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा हाेऊ शकतो. पण अजूनही तशा हालचाली नाहीत.

गोंदिया, गोरेगाव की अर्जुनी मोरगाव ?

भाजपकडून अध्यक्षपदासाठी ज्या नावांची चर्चा सुरू आहे, त्यात गोंदिया, गोरेगाव आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीन सदस्यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, भाजपचे वरिष्ठ नेते आपला कल कोणत्या तालुक्याकडे देतात, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: finally the date of Zilla Parishad gondia President election has decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.