अखेर शेतातून पाईपलाईनचे खोदकाम झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 05:00 AM2022-02-19T05:00:00+5:302022-02-19T05:00:07+5:30

धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ चे पाणी बोदलकसा जलाशयात सोडले जाणार असून, यासाठी नवीन पाइपलाइनचे खोदकाम सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. फक्त अर्धा किलोमीटरचे खोदकाम सुकडी ते सोनझारीटोला (पिंडकेपार) येथे उरले आहे. ही अर्धा किमीची पाइपलाइन शेतकऱ्यांच्या शेतातून न्यावी, असे संबंधित विभागाला वाटते. पण शेतकऱ्यांना आपल्या शेतातून पाइपलाइन जाऊ द्यायची नाही. त्यामुळे मागील वर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खोदकाम करून दिले नाही.

Finally the excavation of the pipeline from the field started | अखेर शेतातून पाईपलाईनचे खोदकाम झाले सुरू

अखेर शेतातून पाईपलाईनचे खोदकाम झाले सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी-डाकराम : धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ ची पाइपलाइन आपल्या शेतातून जाऊ देणार नाही, असे येथील शेतकऱ्यांनी  जाहीर केले होते. यामुळे पाइपलाइन खोदकामाचे प्रकरण उपविभाग अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे होते. असे असतानाच शुक्रवारी (दि. १८) अचानक प्रकल्पाचे अधिकारी धडकले व त्यांनी  टप्पा-२ च्या पाइपलाइन खोदकामाला येथील शेतकऱ्यांच्या शेतातून अखेर सुरुवात केली. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. 
प्राप्त माहितीनुसार, धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ चे पाणी बोदलकसा जलाशयात सोडले जाणार असून, यासाठी नवीन पाइपलाइनचे खोदकाम सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. फक्त अर्धा किलोमीटरचे खोदकाम सुकडी ते सोनझारीटोला (पिंडकेपार) येथे उरले आहे. ही अर्धा किमीची पाइपलाइन शेतकऱ्यांच्या शेतातून न्यावी, असे संबंधित विभागाला वाटते. पण शेतकऱ्यांना आपल्या शेतातून पाइपलाइन जाऊ द्यायची नाही. त्यामुळे मागील वर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खोदकाम करून दिले नाही. रस्त्याच्या कडेने पाइपलाइनचे काम करावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे हे प्रकरण उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे होते. अशात शुक्रवारी (दि. १८) अचानक प्रकल्पाचे अधिकारी-कर्मचारी पोलीस बंदोबस्तात गावात धडकले व त्यांनी शेतातून खोदकाम करण्यास सुरुवात केली. 
हा प्रकार बघून शेतकरी गोळा झाले व आम्ही आपल्या शेतातून खोदकाम करू देणार नाही, असे म्हणून अडून बसले. ज्यांच्या शेतातून खोदकाम केले जाणार आहे ते गोपाल ठाकरे, कमला सूर्यवंशी, देवा झेगेकार, शिवचरण बोरकर, राजकुमार बोरकर, रामचंद्र गभणे, वाल्मीक गभणे, संजय चंद्रिकापुरे, दयाराम सूर्यवंशी, परमानंद गभने, बावनथडे अशा एकूण २० ते २२ शेतकऱ्यांच्या वतीने प्रतिनिधी मंडळात माजी आमदार दिलीप बंसोड, सरपंच जयश्री गभणे, सेवा सहकारीचे अध्यक्ष विलास मेश्राम, उपसरपंच नीलेश बावनथडे, नवनियुक्त जि. प. सदस्य जगदीश बावनथडे, माजी पोलीस पाटील शिवचरण बोरकर, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामचंद्र गभणे, माजी सरपंच प्रल्हाद दखने, सुभाष कुर्वे, माजी सरपंच संजय चंद्रिकापुरे व गावातील शेतकरी होते. 
माजी आमदार बंसोड यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सहमतीने मार्ग काढा, असे सांगितले. पण अधिकारी कुणाचेही ऐकायला तयार नव्हते. तर अनुचित घटना घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, पोलीस निरीक्षक योेगेश पारधीसह १०० हून अधिक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.  धापेवाडा उपसा सिंचनचे कार्यकारी अभियंता अंकुर कापसे, उपविभागीय अभियंता पंकज गेडाम, शाखा अभियंता राजकुमार देशमुख, शाखा अभियंता नागपुरे,  नायब तहसीलदार नागपुरे व कर्मचारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने काम सुरू 
जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आहे म्हणून आम्ही खोदकाम शेतातून केले. शेतकऱ्यांना शासनाच्या शासकीय खरेदी-विक्रीप्रमाणे नुकसान भरपाई देणार. 
-अंकुर कापसे, कार्यकारी अभियंता, धापेवाडा उपसा सिंचन योजना
शेतकऱ्यांवर अन्याय 
जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकी अगोदर सर्व पक्ष व शेतकऱ्यांची बैठक घेऊ, असे सांगितले होते. पण बैठक न घेता पोलीस बंदोबस्त लावून खोदकामाला सुरुवात केली. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे.  
-नीलेश बावनथडे,  उपसरपंच 
जिल्हाधिकाऱ्यांनी गावात बैठक घेऊन शेतकऱ्यांची समस्या ऐकून तोडगा काढायला पाहिजे होता. एकाएकी पोलीस बंदोबस्त घेऊन खोदकाम सुरू करणे हे नियमाला धरून नाही. याची चौकशी व्हावी.  
- जयश्री गभणे, सरपंच

 

Web Title: Finally the excavation of the pipeline from the field started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.