अखेर धरणाच्या पाळीवरील वृक्षतोड सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:34 PM2018-03-24T22:34:54+5:302018-03-24T22:34:54+5:30
इटियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील वाढलेल्या झाडांमुळे पाळीला धोका निर्माण होण्याची शक्यता लोकमतने २० मार्चच्या अंकात प्रकाशित केली होती. हे वृत्त प्रकाशित होताच इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागात खळबळ माजली.
आॅनलाईन लोकमत
अर्जुनी मोरगाव : इटियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील वाढलेल्या झाडांमुळे पाळीला धोका निर्माण होण्याची शक्यता लोकमतने २० मार्चच्या अंकात प्रकाशित केली होती. हे वृत्त प्रकाशित होताच इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागात खळबळ माजली. अखेर धरणाच्या पाळीवरील वृक्षतोडीला शनिवारी सुरुवात करण्यात आली. २० ते २५ फूट उंचीची झाडे होईपर्यंत ही बाब विभाग तसेच धरण सुरक्षा विभागाच्या निदर्शनास कशी आली नाही? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत असून यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.
यासंदर्भात इटियाडोह संरक्षण, संवर्धन समितीचे श्रीधर हटवार यांनी २६ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या धरण सुरक्षा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना तक्रार केली होती. या तक्रारीनंतरच हे बिंग फुटले होते. या विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितापणामुळे पाळीवर सुमारे २० ते २५ फूट उंचीची झाडे वाढली. वेळोवेळी वृक्ष तोड झाली असती तर ऐवढी मोठी झाडे झालीच नसती. धरण व कालवे क्षेत्रातील वाढणाºया झाडांची कत्तल करण्यासाठी निधीच उपलब्ध होत नसल्याचे तुणतुणे वाजवितात. त्यामुळे शासन व प्रशासनाचे अशा गंभीर बाबींकडे लक्षच नाही हे यातून सिद्ध होते.
हटवार यांनी केलेल्या तक्रारीत अनेक वर्षांपासून पाळीवरील झाडे कापलेली नाहीत. वाढलेल्या झाडांच्या मुळांमुळे पाळीची जमीन पोखरुन धरणाचे पाणी झिरपेल व यामुळे पाळीला धोका निर्माण होऊ शकतो. ही झाडे सुमारे २० ते २५ फूट उंचीची असून यासंदर्भात धरण सुरक्षा विभागाला मार्गदर्शन मागविले होते. मात्र त्यांनी मार्गदर्शन करण्याऐवजी पावसाळा पूर्व २०१४ ते पावसाळा उत्तर २०१७ मध्ये निरीक्षण केल्याचे स्पष्ट केले. या अहवालात धरणाच्या पाळीवर झाडे वाढलेली नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात नाशिकच्या कार्यकारी अभियंत्यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश इटियाडोह पाटबंधारे विभागाला १२ मार्च रोजी दिले आहेत.
या पाळीवर सुमारे २० ते २५ फूट उंचीची झाडे आहेत. ही पावसाळा उत्तर २०१७ चे नंतर अवघ्या ६ महिन्यात ऐवढी मोठी कशी होऊ शकतात. याचा अर्थ वारंवार सादर होणारा तपासणी अहवाल संशयास्पद आहे. याची योग्य ती चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.