कल्याणकारी योजनेतून आर्थिक सक्षमीकरण
By Admin | Published: February 26, 2016 02:04 AM2016-02-26T02:04:30+5:302016-02-26T02:04:30+5:30
केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनेच्या माध्यमातून जनतेचे आर्थिक सक्षमीकरणासोबत ...
जि.प. अध्यक्ष उषा मेंढे : विशेष जनजागृती कार्यक्रम
गोंदिया : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनेच्या माध्यमातून जनतेचे आर्थिक सक्षमीकरणासोबत विकास साध्य होऊ शकतो म्हणून लोकांना पंतप्रधान सामाजिक सुरक्षा योजना, मुद्रा योजना तसेच कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यावा, असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई मेंढे यांनी व्यक्त केले.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय नागपूरच्यावतीने आमगाव येथील पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित विशेष जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
विशेष जनजागृती कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, पंचायत समितीच्या सभापती हेमलता डोये, तहसीलदार राजीव शक्करवार, गटविकास अधिकारी सी.जी. मून, क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने उपस्थित होते.
मेंढे म्हणाल्या, प्रधानमंत्री जनधन योजनेसोबतच बेटी बचाव बेटी पढाओ या सारख्या सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजनांची गरज आहे. इतर योजनेच्या माध्यमातून लोकांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होणार असून या योजनांचा लाभ जनतेने घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे म्हणाले की, केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक संकटातून सावरण्याचा आणि सामाजिकदृष्ट्या आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेने केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसेच स्वच्छ भारत करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमगाव पंचायत समितीच्या सभापती हेमलता डोये तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले.
बँक आॅफ इंडियाच्या प्राजक्ता बारई यांनी मुद्रा आणि जनधन योजनेबाबत मार्गदर्शन केले. गोंदियाच्या भारत संचार निगमचे संदीप सोनावने यांनी डिजीटल इंडिया या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आमगावच्या गौर यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ याविषयी मार्गदर्शन केले.
क्षेत्रीय प्रचार कार्यालय नागपूरच्यावतीने आयोजित या विशेष जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय आमगावच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
बँक आॅफ इंडिया, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योग केंद्र गोंदिया, नेहरु युवा केंद्र, भारत मिशन जि.प. गोंदिया यांच्यावतीने ते राबवित असलेल्या योजनांची माहिती देणारे स्टॉलस लावण्यात आले होते.
यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील सहभागींना पुरस्कार देण्यात आले. विशेष जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी आमगावात रॅली काढण्यात आली.
यावेळी क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे अधिकारी फनीकुमार, रामचंद्र सोनसळे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)