शिक्षणाशिवाय आर्थिक, सामाजिक क्रांती अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:48 AM2018-03-22T00:48:07+5:302018-03-22T00:48:16+5:30
शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजचा तरूण उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे. त्याला सर्वार्थाने स्वयंपूर्ण व मजबूत बनविण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ऑनलाईन लोकमत
अर्जुनी-मोरगाव : शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजचा तरूण उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे. त्याला सर्वार्थाने स्वयंपूर्ण व मजबूत बनविण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणाने मानवाच्या ज्ञानकक्षा रूंदावतात. माणूस अधिक प्रगल्भ बनतो व तो जबाबदारीने वागतो. पुस्तकांचे निरंतर वाचन हे आपल्या सुखी व उज्ज्वल भविष्याची दिशा ठरविणारी असते. त्यामुळे पुस्तके वाचावी. शिक्षणाने सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, बौद्धिक क्रांती घडविता येते, असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी तथा गोंदिया जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
ते येरंडी-दर्रे येथील बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात बोलत होते.
उद्घाटन डी.एम. सोयाम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी चेतन उईके, शीला उईके, गोवर्धन ताराम, सरपंच शहारे, मधू बिहारी, मंजुषा चंद्रिकापुरे, ईश्वार आदी मंचावर उपस्थित होेते.
चंद्रिकापुरे पुढे म्हणाले, जोपर्यंत आपण शिक्षण घेणार नाही तोपर्यंत प्रगती साधता येत नाही. युवकांनी इतरांची मोलमजुरी करण्यापेक्षा शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करावे. पालकांनी आपल्या पाल्यांना शिकवावे. बिरसा मुंडा यांनी शिक्षण घेतले व बंड करुन उठले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, दोन आणे जर असतील तर एक आण्याची भाकर व दुसऱ्या आण्याची पुस्तक घ्या. भाकर तुमची भूक भागवेल व पुस्तक जीवन जगवायला शिकवेल, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
या वेळी इतर अतिथींनीसुध्दा मार्गदशन केले. संचालन काटंगे यांनी केले. प्रास्ताविक मधू बिहारी यांनी मांडले. आभार उपसरपंच वाढवे यांनी आभार मानले.