बीडटोला व भुरसीटोला गावाला समस्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:33 PM2018-08-20T23:33:12+5:302018-08-20T23:33:37+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत सोमलपूर अंतर्गत येत असलेली बीडटोला व भुरसीटोला ही दोन्ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत सोमलपूर अंतर्गत येत असलेली बीडटोला व भुरसीटोला ही दोन्ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत. गावात विविध समस्या असून अद्यापही त्या मार्गी न लावल्याने गावकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
मागील २० ते २५ वर्षापूर्वी या गावात तयार केलेला ५०० मीटरचा रस्ता पूर्णपणे उखडला असून त्यावरुन वाहने तर सोडा पायी चालणे देखील कठीण झाले आहे. गावातील समस्यांकडे प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप बीडटोला ग्रामपंचायतचे उपसरपंच मार्कंड बडवाईक यांनी केला आहे. नवेगावबांध जिल्हा परिषद क्षेत्रात सोमलपूर गट ग्रामपंचायतमध्ये बीडटोला गावाचा समावेश होता. तसेच भुरसीटोला गावाचाही समावेश या गट ग्रामपंचायतमध्ये होता. निवडणुका आल्या की एक सुरक्षीत मतदार म्हणून या गावाकडे सोमलपूर येथील राजकारणी बघत असतात.
आपली सत्ता आली की बीडटोला किंवा भुरसीटोला या गावाला उपसरपंच पद देवून पुढील पाच वर्षे ग्रामपंचायतवर सत्ता गाजविण्याचा प्रकार मागील २५ वर्षांपासून सुरू आहे.
भुरसीटोला, बीडटोला या गावातील मुख्य रस्त्यांची अवस्था फारच दयनिय आहे. सोमलपूर, बीडटोला व भुरसीटोला ही तीन गावे मिळून ही ग्रामपंचायत तयार झाली असली तरी बीडटोला व भुरसीटोला ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत. मुंगली ते बाक्टी मार्गावरुन बीडटोला गावाकडे जाण्याच्या मार्गावर पुढील कॅनलपर्यंत ५०० मीटरचा रस्त्याचे डांबरीकरण २५ वर्षांपूर्वी करण्यात आली.
तर कॅनलपासून सानगडी-नवेगावबांध मार्गापर्यंत ६०० मीटरचा भुरसीटोला गावातील मुख्य रस्ताही दहा पंधरा वर्षापूर्वी तयार केला होता. मात्र आता या दोन्ही रस्त्यांची फारच दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांना पायी चालणे सुध्दा कठीण झाले आहे.
त्यामुळे बीडटोला, बीडटोली, भिमनगर व भुरसीटोलाच्या नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. तर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. पिण्याच्या पाण्याची सुध्दा पुरेशी व्यवस्था नाही. अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली असून ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्याच इमारतीत अद्यापही चिमुकल्यांवर संस्कार केले जात आहे.
योजनांपासून कोसो दूर
बीडटोला व भुरसीटोला येथील गावकरी अद्यापही शासनाच्या विविध विकासात्मक योजनांपासून कोसो दूर आहेत. शासनाच्या योजना अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहचल्याच नाही. स्वच्छ भारत योजनेतंर्गत शौचालयाचा लाभ सुध्दा येथील गावकºयांना मिळाला नाही.
स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करा
सोमलपूर ग्रामपंचायत बीडटोला व भुरसीटोला या गावाची विकासाबाबत उपेक्षा करीत आहे. त्यामुळे भुरसीटोला व बीडटोला गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत तयार करावी. सोमलपूर ग्रामपंचायतचे या गावांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या गावांना सोमलपूर ग्रामपंचायतमधून वगळण्यात यावे. या दोन्ही गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतने पावले उचलण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.