कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांना दीड लाख लोकांना ७९ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:27 AM2021-03-20T04:27:55+5:302021-03-20T04:27:55+5:30
गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शासन व प्रशासनाने हलगर्जीपणे वागणाऱ्या लोकांना दंड ठोठावण्याचा उपक्रम सुरू केला. कोरोनाच्या ...
गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शासन व प्रशासनाने हलगर्जीपणे वागणाऱ्या लोकांना दंड ठोठावण्याचा उपक्रम सुरू केला. कोरोनाच्या संसर्गाला घेऊन सुरुवातीपासून आतापर्यंत करण्यात आलेल्या दंडापोटी १ लाख ५० हजार ६३५ लोकांकडून ७९ लाख २ हजार ९०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. ही कारवाई मार्च २०२० ते आतापर्यंतची आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाही लोक फिजिकल डिस्टन्स न ठेवता गर्दी करतात. तसेच तोंडाला मास्क न लावता बिनधास्त फिरत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांत ही कारवाई करण्यात आली. महसूल विभाग, नगर परिषद प्रशासन व पोलीस विभागाने केलेल्या कारवाईतून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. मार्च २०२० ते मार्च २०२१ या दरम्यान फिजिकल डिस्टन्स न ठेवणाऱ्या १ हजार ७४० जणांकडून ३६ लाख १४ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर मास्क न लावता मुक्त संचार करणाऱ्या लोकांवर पहिल्या लाटेत ५०० रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. दुसऱ्यावेळी म्हणजेच १६ फेब्रुवारीपासून मास्क घालणाऱ्यांवर १०० रुपये दंड आकारला जात आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत मास्क न लावणाऱ्या १ लाख ४८ हजार ८९५ लोकांकडून ४२ लाख ८३ हजार ७०० रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले. दंड म्हणून वसूल करण्यात आलेली रक्कम जिल्हा प्रशासनाकडे जमा केली आहे.
बॉक्स
२०२१ मध्ये ३०५४ जणांना दंड
सन २०२१ मध्ये करण्यात आलेल्या कारवाईत फिजिकल डिस्टन्सिंगच्या ७७ प्रकरणांतून ७ हजार ७०० रुपये दंड, तर मास्क न वापरणाऱ्या २ हजार ९७७ लोकांकडून २ लाख ९७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एकूण ३ लाख ५ हजार ४०० रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला आहे.
......
बॉक्स
गोंदिया शहरात सर्वाधिक दंड वसूल
गोंदिया शहरात सर्वाधिक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नगर प्रशासन, पोलीस यंत्रणा, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. पोलीस विभागाकडून सर्वाधिक दंडात्मक कारवाई करण्यात आली. गोंदिया शहर पोलीस, रामनगर पोलीस व जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जिल्हाभरात झालेल्या कारवाईपैकी अर्ध्यापेक्षा जास्त कारवाया गोंदिया शहरातील आहेत.
.......
कोट
कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. नागरिकांनी कोरोनाला घेऊन हलगर्जी करू नये. सर्वांनी तोंडाला मास्क बांधावे. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवावा. कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी. हलगर्जी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.
- विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया.
........................
बॉक्स
बिनधास्तपणे वावरतात नागरिक
कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी लोक बिनधास्तपणे वागत आहेत. लग्नाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. बाजारात, बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी करूनही अनेकांच्या तोंडाला मास्क दिसत नाही.
..........
कोरोना नियंत्रणासाठी कारवाया दाखल गुन्हे
विना मास्क- १,४८,८९५
फिजिकल डिस्टन्स न पाळणे- १७४०
मंगल कार्यालय, हॉल-६