कोचिंग क्लासेसना ‘फायर आॅडिट’ची अॅलर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:14 PM2019-05-27T22:14:30+5:302019-05-27T22:14:56+5:30
२० जणांचा जीव घेणाऱ्या सूरत येथील घटनेने अवघ्या देशाला हादरून सोडले आहे. या घटनेतून मात्र कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांचा जीव किती धोक्यात आहे, याची प्रचिती आली. विशेष म्हणजे, शहरातील कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला घेऊन काहीच उपाययोजना नसल्याची बाब पुढे आली आहे. परिणामी येथील विद्यार्थीही आपला जीव धोक्यात घालून कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : २० जणांचा जीव घेणाऱ्या सूरत येथील घटनेने अवघ्या देशाला हादरून सोडले आहे. या घटनेतून मात्र कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांचा जीव किती धोक्यात आहे, याची प्रचिती आली. विशेष म्हणजे, शहरातील कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला घेऊन काहीच उपाययोजना नसल्याची बाब पुढे आली आहे. परिणामी येथील विद्यार्थीही आपला जीव धोक्यात घालून कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सुरतमधील एका कोचिंग क्लासेसमध्ये आग लागल्याने तेथील २० विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. शुक्रवारी (दि.२३) घडलेल्या या घटनेने अवघा देश हादरून गेला. कोचिंग क्लासेसमध्ये आगीपासून सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना नसल्याने विद्यार्थ्यांना इमारतीच्या चवथ्या माळ््यावरून उडी मारावी लागली. या घटनेने मात्र गोंदियातीलही कोचिंग क्लासेसमधील सुरक्षिततेच्या उपाययोजनांची पोलखोल केली आहे.शहरातील एकाही कोचिंग क्लासेसचे ‘फायर आॅडीट’ झाले नसल्याची माहिती आहे. सध्या स्थितीत शिक्षण क्षेत्रापेक्षा जास्त फायद्याचा दुसरा कोणताच व्यापार दिसून येत नाही.
त्यामुळे सध्या कुणालाही व्यापार सुरू करावयाचा असल्यास एकतर शाळा नाहीतर कोचिंग क्लासेस उघडत आहेत. यामुळेच शहरात बघावे तेथे शाळा व कोचिंग क्लासेस दिसून येत आहेत. लाखो रूपयांची उलाढाल करतानाच मात्र त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत हातवर केले जात आहे. सूरतमध्ये घडलेल्या घटनेने गोंदियातील कोचिंग क्लासेसवाल्यांचा हा व्यापार उघडकीस आणला आहे.
येथील अग्निशमन विभागात विचारणा केली असता शहरातील एकही कोचिंग क्लासेसने ‘फायर आॅडिट’ केले नसल्याचे सांगीतले. त्यामुळे येथील कोचिंग क्लासेस मधील विद्यार्थी सुरक्षीत नसल्याची बाब पुढे आली आहे.
एकंदरीत कोचिंग क्लासेस संचालकांना फायर आॅडिट करण्याची अॅलर्जी का हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
घटनेनंतर एकाला आली जाग
सुरतमधील घटना बघितल्यानंतर येथील एका कोचिंग क्लास संचालकाला जाग आली आहे. शहरातील हड्डीटोली रिंगरोडवर असलेल्या कॅरिअर झोन या कोचिंग क्लासेसची मोठी इमारत असून त्याचे ‘फायर आॅडिट’ झालेले नाही. त्यामुळे या कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी शनिवारी येथील अग्निशमन कार्यालयात धाव घेतल्याची माहिती आहे. असे असताना मात्र अन्य कोचिंग क्लासेसनेही स्वेच्छेने त्यांच्या इमारतींचे ‘फायर आॅडिट’ करवून घेणे गरजेचे झाले आहे.
अग्निशमन विभाग राबविणार मोहीम
येथील अग्निशमन विभागातील अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी, शहरातील मोठ्या कॉम्प्लेक्सवाल्यांना दोनदा नोटीस दिल्याचे सांगीतले. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही व्यक्त केली. त्यात आता सुरतमधील प्रकार घडल्याने शहरातील कोचिंग क्लासेसचे सर्वेक्षण सुरू करण्याची मोहीम राबविणार असल्याचे सांगीतले.
नगर परिषदेने कठोर पाऊल उचलावे
नगर परिषदेचा अजब-गजब कारभार कुणापासून लपलेला नाही. शहरात कित्येक मोठे कॉम्प्लेक्स तयार झाले काहीचे बांधकाम सुरू आहे आहेत. यातील तयार झालेल्या कित्येक कॉम्प्लेक्स मालकांकडून नगर परिषदेची परवानगी आहे. मात्र त्यांच्या कॉम्प्लेक्सचे ‘फायर आॅडिट’ झालेले नाही. अशात ‘फायर आॅडीट’ झाले नसताना मात्र त्यांच्याक डे नगर परिषदेची परवानगी आली कशी हा संशोधनाचा प्रश्न आहे. अगोदरच शहरातील बिंदल प्लाझामधील घटनेने जिल्हा हादरलेला आहे. त्यानंतरही एवढी मोठी चूक कशी होत आहे याची चौकशी करण्याची गरज असून ‘फायर आॅडिट’ न करविणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल उचलण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.