आगीत १६ दुकाने जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 09:26 PM2018-04-30T21:26:52+5:302018-04-30T21:27:02+5:30
शहरातील भाजीबाजारातील पान लाईनमध्ये लागलेल्या आगीत १६ दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील भाजीबाजारातील पान लाईनमध्ये लागलेल्या आगीत १६ दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास घडली. या आगीत जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पान लाईनमध्ये लागलेल्या आगीत सिंध बुट हाऊस, साईबाबा बुट हाऊस, अंबे बुट हाऊस, न्यू बजाज क्लाथ स्टोअर्स, मुकेश फुट वेयरसह इतर दुकान जळून खाक झाली. ही आग ऐवढी उग्र होती की त्यात दुकानातील संपूर्ण साहित्याची राख झाली.
प्राप्त माहितीनुसार सोमवारी पहाटेच्या सुमारास भाजीबाजारातील पान लाईनमधील दुकानांना आग लागल्याची बाब या परिसरातील रहिवाश्यांच्या लक्षात आली. त्यांनी याची माहिती लगेच शहर पोलीस स्टेशन व अग्नीशमन विभागाला दिली. त्यानंतर गोंदिया अग्नीशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीने उग्र रुप धारण केल्याने लांजी, बालघाट, तुमसर आणि अदानी प्रकल्पाच्या अग्नीशमन वाहनाना पाचारण करण्यात आले होते. जवळपास दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
गोंदिया नगर परिषद अग्नीशमन विभागाच्या चार गाड्यांनी २३ वेळा फेºया मारुन आगीवर नियंत्रण मिळविले. तर अदानी प्रकल्पाचे एक व बालाघाटच्या दोन आणि लांजी येथील वाहनाव्दारे पाणी भरुन आणून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्नीशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी वित्त हाणी टळली. याच दुकानांना लागून लोहा लाईन व भाजीबाजारातील इतर दुकाने आहे. त्यामुळे ही आग इतरत्र पसरली असती तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. दरम्यान या आगीत १६ दुकानांची अक्षरक्ष:राख झाली. दुकानातील संपूर्ण सामानाचा कोळसा झाला. त्यामुळे दुकानदारांचे दीड कोटी रुपयांच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान ही आग शार्ट सर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच या परिसरातील एका भाड्यांच्या दुकानाला शार्ट सर्कीटमुळे आग लागली होती. मात्र वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठे नुकसान टळले होते.
लोकप्रतिनिधी, अधिकाºयांची भेट
भाजीबाजारातील पान लाईनमधील दुकानांना आग लागल्याची माहिती मिळताच आ.गोपालदास अग्रवाल, माजी. आ. राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्याधिकारी चंदन पाटील, नगरसेवक पकंज यादव, लोकेश यादव व दुर्गेश रहांगडाले यांनी घटनास्थळी पोहचून माहिती घेतली.
विद्युत पुरवठा खंडीत
पान लाईनमधील दुकांनाना शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात. त्यामुळेच आगीच्या घटनेनंतर या परिसरातील विद्युत पुरवठा काही काळ खंडीत ठेवण्यात आल्याची माहिती आहे. पान लाईनमधील आगीच्या घटनेनंतर शहरात विविध चर्चेला पेव फुटले आहे.