आग लावल्याने झाडे वाळली ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:30 AM2021-05-09T04:30:21+5:302021-05-09T04:30:21+5:30
अर्जुनी मोरगाव : स्थानिक न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोकळ्या जागेत व रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात आली होती. ...
अर्जुनी मोरगाव : स्थानिक न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोकळ्या जागेत व रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात आली होती. कुणीतरी झाडांखाली आग लावल्याने चार-पाच वर्षांपूर्वी लावलेली ही झाडे वाळण्याच्या मार्गावर आहेत.
प्रकृती नेचर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे.
शासनाने पाच वर्षांपूर्वी शतकोटी वृक्षलागवड मोहीम हाती घेतली होती. याअंतर्गत नहराजवळून ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली होती. डाव्या बाजूला मोकळी जागा होती तेथील झाडाखाली कुणीतरी आग लावली. या आगीची धग झाडांना पोहोचली. काही झाडांचे तर केवळ काळ्या रंगाचे खांब तेवढे उभे आहेत. सर्व हिरवी पाने गळून पडली. झाडांखाली आग लावल्याचे काळे खुरपे दिसून येत आहेत. काही झाडांना बीजे लागली होती. ही बीजे गळून त्यांचे नवीन झाडात रूपांतर होणार होते. या कृत्यामुळे मात्र नवीन रोपं तयार होण्याची शक्यता धूसर वाटत आहे. ही झाडे सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वी लावण्यात आली होती. यावर शासकीय खर्चातून उन्हाळ्यात मजुरांकडून पाणी दिले जात होते. झाडे जगविण्यासाठी यावर विभागाने प्रचंड मेहनत केल्याचे दिसून येते.
सध्या देशात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. या महामारीत ऑक्सिजनचा तुटवडा सर्वत्र जाणवतो. ऑक्सिजनअभावी अनेक लोकं मृत्युमुखी पडत आहेत. झाडांकडून मानवाला ऑक्सिजन मिळतो. पण मानव एवढा निर्दयी झाला आहे की वृक्ष नेस्तनाबूत करण्यास मागेपुढे बघत नाही. या परिसरानंतर न्यायालयाचे काटेरी तारांचे कुंपण आहे. ही आग नक्की कुणी लावली ते कळायला मार्ग नाही. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. पावसाच्या पाण्याने या झाडांना वरदान मिळते की ते पूर्ण वाळतील ते आगामी काळात कळेल. पण तूर्तास ही आग नेमकी कुणी व कशासाठी लावली याचा शोध घेणे आवश्यक आहे. या प्रकाराबद्दल स्थानिक प्रकृती नेचर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे.