पहिल्याच दिवशी एटीएममध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 09:06 PM2018-11-04T21:06:06+5:302018-11-04T21:07:09+5:30

शहरात विविध कंपन्यांचे पन्नासावर एटीएम आहेत. मात्र रविवारी (दि.४) जवळपास सर्वच एटीएममध्ये नो कॅशचे फलक लागले होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एटीएममध्ये तुटवडा निर्माण झाल्याने पुढील तीन चार दिवस काय असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे.

The first ATM strike | पहिल्याच दिवशी एटीएममध्ये ठणठणाट

पहिल्याच दिवशी एटीएममध्ये ठणठणाट

Next
ठळक मुद्देग्राहकांची भटकंती : कॅशचा तुटवडा, अर्ध्यापेक्षा अधिक एटीएम रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरात विविध कंपन्यांचे पन्नासावर एटीएम आहेत. मात्र रविवारी (दि.४) जवळपास सर्वच एटीएममध्ये नो कॅशचे फलक लागले होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एटीएममध्ये तुटवडा निर्माण झाल्याने पुढील तीन चार दिवस काय असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. तर एटीएम घेवून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आल्या पावलीच परत जाण्याची वेळ आली. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.
दिवाळीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला असून बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. रविवारी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसूबारस निमित्त शहरातील व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत आले होते. जेव्हापासून एटीएमची सुविधा उपलब्ध झाली तेव्हापासून बरेच ग्राहक स्वत:जवळ रोख रक्कम न बाळगता एटीएम ठेवतात. तसेच शहरातील बाजारपेठ व इतर भागात विविध कंपन्याचे ५२ एटीएम आहे. यापैकी बाजारपेठ परिसरातील सर्वच एटीएममध्ये रविवारी नो कॅशचे बोर्ड लागले होते.
तर शनिवारी सुद्धा बहुतेक एटीएममध्ये ठणठणाट होता. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच अडचण झाली. शहरातील सर्वच विक्रेत्यांकडे एटीएम कार्ड स्वॉप करुन खरेदी करण्याची सुविधा नाही.काही मोजक्याच व्यावसायीकांकडे ही सुविधा आहे. त्यामुळे एटीएम कार्डच्या भरोश्यावर खरेदी करण्यासाठी आलेल्या अनेक ग्राहकांना खरेदी न करताच परत जावे लागले. रविवारी दुपारी स्टेट बँकेच्या एटीएममध्ये कॅश उपलब्ध होती. त्यामुळे या एटीएम केंद्राबाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांची रांग लागली होती. मात्र संध्याकाळी हे एटीएम सुद्धा रिकामे झाले. परिणामी काही ग्राहकांना शहराबाहेरील एटीएम केंद्रात जावून पैसे काढण्याची वेळ आली आहे. दरम्यान या प्रकारामुळे ग्राहकांनी बँक प्रशासन आणि एटीएम कंपन्यांवर रोष व्यक्त केला.
कार्डलेस व्यवहारासाठी नो कॅश
दिवाळी दरम्यान ग्राहक विविध वस्तूंची खरेदी करतात. मात्र हा सर्व व्यवहार रोख रक्कमेने केला जातो. यामुळे बरेचदा कॅशची टंचाई निर्माण होत असते. केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदीनंतर कार्डलेस व्यवहाराला अधिक प्राधान्य दिले आहे. यासाठी विविध अ‍ॅप देखील तयार केले आहे. पण, यानंतरही याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच एटीएममध्ये कॅशचा तुटवडा निर्माण करुन ग्राहकांना कार्डलेस व्यवहाराची सवय लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे.
बहुतेक एटीएम सुरक्षा रक्षकाविनाच
एटीएम मशीन्सची छेडछाड व फोडण्याचे घटना वाढत आहे. मात्र यानंतर बँका आणि संबंधित कंपन्यानी अद्यापही एटीएमच्या सुरक्षेबाबत पाऊल उचलले नाही. त्यामुळे केवळ सीसीटिव्ही भरोश्यावर एटीएमची सुरक्षा केली जात असल्याचे चित्र आहे. तर बहुतेक एटीएममध्ये सुरक्षा रक्षकाची नियुक्तीच करण्यात आली नाही.
बँकांचे मौन
शहरातील बहुतेक एटीएम हे राष्ट्रीयीकृत बँका आणि कंपन्याचे आहेत. मात्र या सर्व एटीएममध्ये शनिवार (दि.३)पासून ठणठणाठ आहे. यामुळे ग्राहकांना एटीएमच्या शोधात दूरवर भटकंती करावी लागत आहे. एटीएममध्ये निर्माण झालेल्या कॅशच्या तुटवड्याबाबत बँकाना विचारणा केली असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.

Web Title: The first ATM strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.