आधी कोरोनाची लस नंतर पोलिओचा डोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:14 AM2021-01-13T05:14:32+5:302021-01-13T05:14:32+5:30
गोंदिया : देशाला पोलिओमुक्त करण्यासाठी राबविण्यात पोलिओ मोहिमेंतर्गत येत्या १७ जानेवारीला नियोजित असलेली पल्स पोलिओ मोहीम स्थगित करण्यात आली ...
गोंदिया : देशाला पोलिओमुक्त करण्यासाठी राबविण्यात पोलिओ मोहिमेंतर्गत येत्या १७ जानेवारीला नियोजित असलेली पल्स पोलिओ मोहीम स्थगित करण्यात आली आहे. यामुळे १७ तारखेला ५ वर्षांच्या आतील चिमुकल्यांना ‘दो बूँद जिंदगी के’ दिली जाणार नाही. १६ जानेवारीला कोरोना लसीकरण मोहीम असल्याने पोलिओ लसीकरण मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे.
अवघ्या आयुष्यावर अपंगत्वाचा वार करणाऱ्या पोलिओवर पूर्णपणे मात करण्यासाठी शासनाकडून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाते. त्यात वर्षांच्या आतील बाळाला तोंडावाटे पोलिओचा डोज दिला जात असून त्यालाच ‘दो बूँद जिंदगी के’ असे म्हटले जाते. यंदा पल्स पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम येत्या १७ जानेवारीला नियोजित होता. मात्र, १६ तारखेला अवघ्या देशाला विळखा घालून बसलेल्या कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यादृष्टीने १७ तारखेला असलेली पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम स्थगित करण्यात आली आहे. यामुळे १७ तारखेला ५ वर्षांच्या आतील बालकांना पोलिओ डोज दिला जाणार नसल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.
----------------------------
कोरोना लसीकडे सर्वांच्या नजरा
मार्च २०१९ पासून देशात कहर करणाऱ्या कोरोनावरील लस भारतात तयार करण्यात आली असून केंद्र सरकारने १६ तारखेपासून लसीकरणाचा मुहूर्त निश्चित केला आहे. जीवघेण्या कोरोनावरील लसीसाठी अवघ्या जगाच्या नजरा लागल्या असून अशात भारतात २ लस तयार करण्यात आल्या असून त्यांना भारत सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लसीकरणाला घेऊन सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यासाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या नियोजनाप्रमाणेच लसीकरण केले जाणार असल्याने आरोग्य विभागाची चांगलीच कसरत होणार आहे. यासाठीच पल्स पोलिओची १७ तारखेची मोहीम स्थगित केली आहे.