नववधूवर पहिल्याच दिवशी भासऱ्याकडून अत्याचार
By admin | Published: February 21, 2017 12:57 AM2017-02-21T00:57:29+5:302017-02-21T00:57:29+5:30
एकमेकावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांनी प्रेमविवाह केला. परंतु त्या नवदाम्पत्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता.
जंगलातील घटना : प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध
गोंदिया : एकमेकावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांनी प्रेमविवाह केला. परंतु त्या नवदाम्पत्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्या विरोधामुळे गावाच्या मंदिरात लग्नाच्या दिवशी पहिलीच रात्र काढत असताना भासऱ्याने भावसुनेवर बलात्कार केला. या घटनेसंदर्भात सहा महिन्यानंतर आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
आमगाव तालुक्याच्या चिरचाळबांध कुणबीटोला येथील एका युगुलाने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता मांडोबाई येथे १५ आॅगस्ट २०१६ रोजी लग्न केला. लग्न करून दोघेही घरी परतल्यावर त्यांना घरी ठेवण्यास घरच्यांनी विरोध केला. त्यामुळे त्या दाम्पत्यांनी पहिली रात्र गावाशेजारी असलेल्या बासीपार जंगल परिसरात मंदिरात काढण्याचे ठरविले. रात्री मंदिरात गेल्यावर पिडीत सिमा (बदललेले नाव) ला तहान लागली.
तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी नवरा गावात जाण्यापूर्वी रात्रीच्यावेळ असल्याने तिच्या मदती आपल्या मोठ्या भावाला बोलाविले. त्यानंतर तिचा पती पाणी आणायला गेला. आरोपी मनोज शालीकराम चव्हाण (२७) याने तिचे हातपाय बांधून त्यावेळी तिच्यावर रात्री ११ वाजता बलात्कार केला. लग्नाच्या पहिल्याच रात्री भासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. त्या नवदाम्पत्यांना घरी ठेवण्यास घरच्यांनी नकार दिल्यामुळे त्या जोडप्याने दुसऱ्या दिवशी मजूरीसाठी गुजरातला जाणे पसंत केले. ते दोघेही गुजरातला काही दिवस एकत्र राहील्यामुळे सिमाचा पती तेथून बेपत्ता झाला. एकटीच असलेल्या सिमाने आपला पती घरी गेला असावा म्हणून चार दिवसापूर्वी घर गाठले.
घरी आल्यावर पती नव्हता मात्र तिला घरात घेण्यास सासू-सारे व भासऱ्याने विरोध केला. १५ आॅगस्ट रोजी भासऱ्याने केलेल्या बलात्कारासंदर्भात १९ फेब्रुवारी रोजी आमगाव पोलिसात तक्रार करण्यात आली.
आमगाव पोलिसांनी यासंदर्भात आरोपी मनोज शालीकराम चव्हाण (२७) याच्या विरूध्द भादंविच्या कलम ३७६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आमगाव पोलिसांनी आरोपीला रविवारीच ताब्यात घेतले. आज सोमवारी आमगाव न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास ठाणेदार प्रशांत भस्मे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)