शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच

By admin | Published: June 27, 2017 01:02 AM2017-06-27T01:02:29+5:302017-06-27T01:02:29+5:30

प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन जोडी गणवेश देण्याची योजना सुरू केली.

The first day of school is not without uniform | शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच

शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच

Next

नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन जोडी गणवेश देण्याची योजना सुरू केली. यंदापासून गणवेशाची रक्कम विद्यार्थी व त्यांच्या आईच्या संयुक्त खात्यात ही रक्कम देण्याचा निर्णय घेतला. परंतु आजपासून शाळा सुरू होत असूनही ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांसाठी कवडीही महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत दिली नाही. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच राहणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, त्यांना शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी व श्रीमंत गरीब असा भेदभाव नष्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची योजना शासनाने सुरू केली. शाळेत सर्व विद्यार्थी गणवेशात यावे यासाठी शासनाने वर्षातून दोन गणवेश विद्यार्थ्यांना देण्याचा पायंडा रचला. वर्ग १ ते ८ च्या सर्व विद्यार्थीनी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याचे नियम तयार केले. विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यासाठी त्या गणवेशाची रक्कम त्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येत होती.
मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष मिळून त्या गणवेशाची खरेदी करायचे. एका गणवेशासाठी २०० रूपये असे दोन गणवेशासाठी ४०० रूपये एका विद्यार्थ्याच्या मागे शाळेला मिळत होते. परंतु या गणवेशातही मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असल्याच्या बातम्या झळकत असल्याने ही बाब शासनाच्या लक्षात आली. आता गणवेशाची रक्कम सार्व शिक्षा अभियानाकडून शाळा समितीलाच देण्यात येणार आहे.
सन २०१७-१८ या सत्रातील ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यासाठी ३ कोटी ९ लाख ५२ हजार ८०० रूपये शासनाकडे मागण्यात आले. परंतु मंगळवारपासून शाळा सुरू होत असूनही शासनाने या रकमेतील एकही पैसे दिले नाही. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईतर्फे निधी पाठविण्याची प्रक्रिया महिनाभरापासून सुरू असल्याचे सांगितले जाते. परंतु कवडीही या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आली नाही. यंदाचा प्रवेशोत्सव गणवेशाविनाच विद्यार्थ्यांना साजरा करावा लागणार आहे.

पालकांवर जबाबदारी
यंदा शासनाकडून आतापर्यंत गणवेशासाठी एकही पैसे न आल्यामुळे त्यांच्या पालकांनीच आपापल्या पाल्यांना गणवेश खरेदी करून द्या असे पत्र शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळेच्या मुख्याध्यापकांना पाठविले आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांनाच या संदर्भात सूचना दिल्या आहेत. परंतु पालकांना गणवेश सासनाकडून मिळते याची सवय झाल्याने त्यांनीही गणवेश खरेदी केले नाही. गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ च्या ४२ हजार ५८५ मुली, अनुसूचित जातीच्या ४ हजार ७७९ मुले, अनुसूचित जमातीचे ६ हजार ६६५ मुले व दारिद्रय रेषेखालील २३ हजार ३५३ मुले असे एकूण ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन जोडी गणवेश सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी द्यायचे आहेत. परंतु आतापर्यंत गणवेशासाठी कसलीही तळमळ शिक्षण विभागातही दिसत नाही.

गणवेशासाठी एकही पैसा आला नाही. परंतु विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव गणवेशातच व्हावा यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना गणवेश उपलब्ध करून द्यावे, पैसे आल्यावर त्यांच्या खात्यात पैसे टाकू अशा सूचना आमच्याकडून देण्यात आल्या आहेत.
- दिलीप बघेले
समन्वयक सर्वशिक्षा अभियान जि.प. गोंदिया.

Web Title: The first day of school is not without uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.