आरटीई प्रवेशात गोंदिया राज्यात प्रथम; ७०.४९ टक्के प्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 08:15 PM2023-05-10T20:15:25+5:302023-05-10T20:15:51+5:30

Gondia News बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात आली असून, त्यात गोंदिया जिल्ह्यातील ६०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

First in Gondia State in RTE Admission; 70.49 percent admission guaranteed | आरटीई प्रवेशात गोंदिया राज्यात प्रथम; ७०.४९ टक्के प्रवेश निश्चित

आरटीई प्रवेशात गोंदिया राज्यात प्रथम; ७०.४९ टक्के प्रवेश निश्चित

googlenewsNext

कपिल केकत

गोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात आली असून, त्यात गोंदिया जिल्ह्यातील ६०९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. टक्केवारीनुसार बघितल्यास ७०.४९ टक्केवारी होत असून, यामुळे प्रवेशात गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर दिसत आहे. ९ मे रोजीचा हा अहवाल असून, आरटीईअंतर्गत यंदा जिल्ह्यातील ८६४ जागांसाठी तब्बल ३,९५९ अर्ज आले होते. त्यातील ८६३ पालकांना एसएमएस गेला आहे.

वंचित व दुर्बल घटकातील बालकांकरिता इंग्रजी माध्यम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत यंदा राज्यातील ८,८२३ शाळांमध्ये १,०१,८४६ जागा आरक्षित असून, त्यासाठी ३,६४,४१३ अर्ज आले होते. आरटीईअंतर्गत लॉटरी निघाली असून, राज्यातील ९४,७०० पालकांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. यंदा जिल्ह्यातील १३१ शाळांनी आरटीईअंतर्गत नोंदणी केली. त्यात ८६४ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ३,९५९ अर्ज आले होते. यातील ८६३ पालकांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत.

ज्या पालकांना एसएमएस मिळाले आहेत, त्यांना लगेच कागदपत्रांची पडताळणी करून आपल्या पाल्याचा संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे. अहवालानुसार, राज्यातील एकूण ५१,९५९ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.

सर्वांत कमी १९.८९ टक्के प्रवेश लातूरचे

- आरटीई प्रवेश निश्चितीत गोंदिया जिल्ह्याने ७०.४९ टक्के प्रवेश निश्चित करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर बुलढाणा जिल्हा असून, तेथे ६७.१४ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर अकोला जिल्हा असून, तेथे ६६.८० टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. राज्यस्तरावर या तीन जिल्ह्यातील प्रथम तीन क्रमांक पटकावले आहेत. मात्र, सर्वांत कमी प्रवेश निश्चिती लातूर जिल्ह्यात असून, तेथील टक्केवारी फक्त १९.८९ टक्के एवढी आहे.

राज्यातील प्रथम पाच जिल्ह्यांचा तक्ता

जिल्हा- शाळा- जागा- निवड- प्रवेश निश्चित- टक्केवारी

गोंदिया- १३१- ८६४- ८६३- ६०९- ७०.४९

बुलढाणा- २२७- २२४६- २२०३- १५०८- ६७.१४

अकोला- १९०- १९४६- १९२४- १३००- ६६.८०

अहमदनगर- ३६४- २८२५- २८०४- १८४१- ६५.१७

वर्धा- १११- ११११- ११११- ७०५- ६३.४६

Web Title: First in Gondia State in RTE Admission; 70.49 percent admission guaranteed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.