आठ दिवसांत प्रथमच रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:45 AM2021-02-23T04:45:37+5:302021-02-23T04:45:37+5:30
गोंदिया : विदर्भात मागील आठ- दहा दिवसांपासून कोरोना पुन्हा पाय पसरू लागल्याचे चित्र आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ...
गोंदिया : विदर्भात मागील आठ- दहा दिवसांपासून कोरोना पुन्हा पाय पसरू लागल्याचे चित्र आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात होती. सोमवारी (दि.२२) जिल्ह्यात प्रथमच १४ कोरोनाबाधितांची नोंद झाली. मागील आठ- दहा दिवसांतील सर्वाधिक आकडा असल्याने जिल्हावासियांनासुध्दा अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क,सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास प्रशासनाकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे चित्र असताना सोमवारी रुग्णसंख्येत थोडी वाढ झाल्याने ही बाब काळजी वाढविणारी आहे. मागील आठ- दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पाच ते सहा दरम्यान होती. मात्र, सोमवारी प्रथमच १४ बाधितांची नोंद झाली. त्यामुळे ही जिल्हावासियांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू न देण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. सोमवारी १४ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ८ बाधितांनी कोरोनावर मात केली. बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील १३ आणि सालेकसा तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ६९०१९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५७३०९ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ६७६८४ जणांचे स्वॅबनमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६१५१९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४३३९ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १४०९३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
................
कोरोना रिकव्हरी दर ९८.२८ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा रिकव्हरी दर ९८.२८ टक्के आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी आहे. कोरोना रिकव्हरी दर चांगला असला तरी नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काही जिल्ह्यांत वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हावासियांनी काळजी घेतल्यास निश्चितच जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.