आदेश धडकताच पहिल्या टप्प्यात ६० शाळा अधिग्रहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:23+5:302021-06-05T04:22:23+5:30
गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरित सुरू करण्यासाठी आता प्रशासनाने युध्दपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. गुरुवारी (दि. ३) ...
गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरित सुरू करण्यासाठी आता प्रशासनाने युध्दपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. गुरुवारी (दि. ३) अन्न व नागरी पुरवठा विभागाचे आदेश धडकताच शुक्रवारी (दि. ४) जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी रब्बीतील धान खरेदीसाठी ६० शाळा अधिग्रहित करण्याचे आदेश काढले. त्यामुळे आता रब्बीतील धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागील खरीप हंगामातील धानाची गोदामातून अद्यापही उचल झालेली नाही. जवळपास ३० लाख क्विंटल धान गोदामांमध्ये तसेच पडून आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीला गोदामे उपलब्ध नसल्याने विलंब होत होता. खरीप हंगामाला सुरुवात झाली तरी रब्बीची धान खरेदी सुरू न झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना अल्प दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. दरम्यान, शासकीय धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत होता. गोदामांची अडचण दूर करण्यासाठी आश्रम शाळा, जि. प. शाळा आणि शासकीय इमारतींचा वापर करण्याची मागणी पुढे केली जात होती. त्याचीच दखल घेत अन्न व नागरी पुरवठा विभागाने रब्बी धान खरेदीसाठी आश्रमशाळा, जि. प.शाळा आणि शासकीय इमारती अधिग्रहित करून त्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्याचीच दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सडक अर्जुनी, तिरोडा, सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एकूण ६० शाळा अधिग्रहित करण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे रब्बीतील धान खरेदीचा मार्ग आता सुकर बनला आहे.
...............
पावसाने वाढविली चिंता
जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील धानाची विक्री करण्यासाठी ते केंद्रावर नेताना शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. तसेच पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने जोखीम पत्करून केंद्रापर्यंत धान शेतकऱ्यांना न्यावे लागणार आहे.