१४ दिवसात प्रथमच रुग्णांची संख्या दीडशेच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:28 AM2021-05-15T04:28:07+5:302021-05-15T04:28:07+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी ५१३ बाधितांनी कोरोनावर मात केली तर १३९ नवीन रुग्णांची नोंद झाली. दोन बाधितांचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू ...
जिल्ह्यात शुक्रवारी ५१३ बाधितांनी कोरोनावर मात केली तर १३९ नवीन रुग्णांची नोंद झाली. दोन बाधितांचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. शुक्रवारी आढळलेल्या १३९ रुग्णांमध्ये सर्वाधिक ४३ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ९, गोरेगाव १४, आमगाव ९, सालेकसा २६, देवरी १९, सडक अर्जुनी २, अर्जुनी मोरगाव १२ आणि बाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांपेक्षा मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्यासुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयातील बेडसुद्धा बरेच रिकामे आहे. शिवाय आता ऑक्सिजन आणि बेडचीसुद्धा समस्या दूर झाली आहे. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,४२,४६८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,१८,०१६ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत १,४५,१९८ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,२४,७०७ नमुने निगेटिव्ह आले आहे. आतापर्यंत एकूण ३९,०८३ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ३४,७५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ३,७०१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ५३२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.........
दुसऱ्या डोससाठी नोंदणी ऑफलाईन की ऑनलाइन
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. यातंर्गत शनिवारी (दि. १५) दहा केंद्रावर विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ४५ वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने गुरुवारी काढलेल्या आदेशात ऑनलाइन नोंदणी करण्याची गरज नसल्याचे सांगत आधारकार्ड आणि मोबाईल घेऊन केंद्रावर यावे असे म्हटले होते. तर दुसऱ्या दिवशी ऑनलाइन नोंदणी करण्याची गरज असल्याचे सांगितले जात होते. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते सुद्धा संभ्रमात होते.
........
१ लाख ९१ हजार नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९१ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे. मात्र यात दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या भरपूर असल्याने शनिवारी आणि रविवारी लसीकरणाची विशेष मोहीम जिल्ह्यात १४० केंद्रावरुन राबविण्यात येणार आहे.