७० वर्षांत प्रथमच मुरकुडोह दंडारीतील समस्यांची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:45 PM2019-07-22T22:45:02+5:302019-07-22T22:45:21+5:30
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही जिल्ह्यातील मुरकुडोह दंडारी आणि टेकाटोला या गावांमध्ये शासनाच्या योजना पोहचल्या नाही.या गावात जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने बससेवा बंद आहे. वीज अद्याप पोहचली नाही.त्यामुळे या गावांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. या गावांमधील समस्यांची मागील ७० वर्षांत प्रथमच पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी गांर्भियाने दखल घेत समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही जिल्ह्यातील मुरकुडोह दंडारी आणि टेकाटोला या गावांमध्ये शासनाच्या योजना पोहचल्या नाही.या गावात जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने बससेवा बंद आहे. वीज अद्याप पोहचली नाही.त्यामुळे या गावांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. या गावांमधील समस्यांची मागील ७० वर्षांत प्रथमच पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी गांर्भियाने दखल घेत समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. त्यामुळे येथील गावकऱ्यांच्या आशा बऱ्याच वर्षांनंतर पल्लवीत झाल्या आहेत.
मुरकुडोह येथील जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी संख्येअभावी मागील दोन वर्षांपासून बंद पडलेली आहे. परिसरातील पाचही गावात पोहोचायला पक्के रस्ते नसल्याने रु ग्णालयापर्यंत नेण्यापूर्वीच अनेकदा रु ग्णांचा वाटेतच मृत्यू होतो. रोजगाराचे कुठलेच साधन येथील नसल्याने गावकऱ्यांचे रोजगाराच्या शोधात स्थलातंरण सुरू आहे. सातपुडा पर्वतरांगेच्या घनदाट जंगलात वसलेल्या या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या असल्याची माहिती पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांना मिळाली. त्याची गांर्भियाने दखल घेत आपल्या स्वीय सहायकासह तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांना या तिन्ही गावातील वास्तविक स्थिती जाणून घेण्यासाठी पाठविले. या कर्मचाऱ्यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधून समस्यांचा आढावा घेतला.अहवालातून निष्पन्न झालेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहे.येथील गावकऱ्यांना मुलभूत सुविधा लवकरात लवकर कशा उपलब्ध करुन देता येतील, या दृष्टीने आराखडा तयार करण्याचे निर्देश फुके यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुरकुडोह क्रमांक १ मध्ये किमान २ बोअरवेल आणि दलदल कुही येथे नाली बांधकामाची मागणी नागरिकांनी केली होती.
ही मागणी सुध्दा त्वरीत मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्री फुके यांनी अधिकाऱ्यांना दिले.
शाळेची घंटा पुन्हा वाजणार
येथील जि.प.ची शाळा मागील दोन वर्षांपासून बंद आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूरवर जावे लागते. परिणामी बरेच विद्यार्थी सुध्दा शाळाबाह्य आहे.विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मागील दोन वर्षांपासून बंद असलेली शाळा पुन्हा सुरू केली जाणार आहे.त्यामुळे या शाळेची घंटा पुन्हा वाजणार असून किलबिलाट ऐकायला मिळणार आहे.
गॅस सिलिंडर उपलब्ध करून देणार
मुरकुडोह दंडारी आणि टेकाटोला या गावांमध्ये अद्यापही शासनाच्या योजना पोहचल्या नाहीत. येथील गावकऱ्यांना केरोसीनमुक्त योजनेतून गॅस सिलिंडर तसेच वीज जोडणी सुध्दा करुन देण्यात येणार आहे. महिनाभराच्या आत येथील वीज जोडणीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री फुके यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाºयांना दिले.
गावातील महिलांना रोजगार
महिला आर्थिक विकास महामंडळच्या विविध योजनेतंर्गत त्यांना येथील महिलांना लघु उद्योगाचे धडे देऊन स्वंयरोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे.बचत गट तयार करुन त्यांन स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. रोजगार हमी योजना या क्षेत्रात विशेष स्वरु पात राबविण्यात येणार आहे.
सिंचनाची सुविधा करणार
या गावांमधील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी येथील तलावाचे खोलीकरण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला पालकमंत्री फुके यांनी दिल्या. रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याला वर्षभर पाणी वाहत असते. या नाल्याचे पाणी अडवून शेतीच्या उपयोगासाठी कश्या प्रकार आणता येईल. या दृष्टीने अभ्यास करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.
दर आठवड्याला आरोग्य तपासणी
विविध सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या या तिन्ही गावातील नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. प्रत्येक गुरूवारी आरोग्य विभागाच्या पथकाच्या माध्यमातून गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच औषधांचे सुध्दा वाटप करण्यात येणार आहे.