८६ दिवसांनंतर प्रथमच बाधितांच्या संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:28+5:302021-06-06T04:22:28+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने डाऊन होत असून शनिवारी (दि.५) कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी घट झाली. तब्बल ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने डाऊन होत असून शनिवारी (दि.५) कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी घट झाली. तब्बल ८६ दिवसांनंतर रुग्ण संख्येत एकदम घट झाल्याने कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यातून आता पूर्णपणे ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. त्यामुळेच जिल्ह्यात आता सोमवारपासून पूर्णपणे अनलॉक केले जाणार आहे.
शनिवारी जिल्ह्यात २२ बाधितांनी कोरोनावर मात केली तर १४ नवीन रुग्णांची नोंद झाली. १ बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या पूर्णपणे आटोक्यात येत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. त्यामुळेच कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट सुध्दा २.७ टक्क्यांवर आला आहे. तर ऑक्सिजनवर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण ६.२ टक्क्यांवर आला आहे. एकंदरीत कोरोनाने आता जिल्ह्यातून परतीची वाट धरल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १६९९८६ बाधितांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १४५०१८ नमुने निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिट अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत १६४२०० नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १४३३२२ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४०९२५ कोरोना बाधित आढळले. त्यापैकी ३९८७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ३५५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर २१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.
.................
२११६ नमुन्यांची चाचणी १४ पॉझिटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी ८८७ आरटीपीसीआर तर १२२९ रॅपिड अँटिजन असे एकूण २११६ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १४ नमुने पाॅझिटिव्ह आले असून त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.६७ टक्के आहे.
................
लसीकरणाची ३ लाखांकडे वाटचाल
कोरोना संसर्गाला प्रतिबंध लावण्यासाठी जिल्ह्यातील एकूण १४० लसीकरण केंद्रावरून लसीकरण केले जात आहे. या अंतर्गत आतापर्यंत २ लाख ७० हजार ५९० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात २०७५८१ नागरिकांना पहिला डोस तर ६३००९ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.