दीड महिन्यानंतर बाधितांच्या आकड्यात प्रथमच वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:42 AM2021-02-26T04:42:35+5:302021-02-26T04:42:35+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे चित्र असताना गुरुवारी (दि.२५) तब्बल दीड महिन्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे चित्र असताना गुरुवारी (दि.२५) तब्बल दीड महिन्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात २४ बाधितांची नोंद झाली तर ५ बाधितांनी कोरोनावर मात केली. कोरोना बाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाल्याने जिल्हावासीयांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात होती. पण गुरुवारी दीड महिन्यानंतर प्रथमच २४ कोरोना बाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव वाढल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्हावासीयांनी ही बाब गांर्भियाने घेत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. गुरुवारी आढळलेल्या २४ बाधितांमध्ये सर्वाधिक १६ बाधित गोंदिया तालुक्यातील आहे. तर तिरोडा १, गोरेगाव १, आमगाव १, सालेकसा १, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चार बाधितांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जवळपास महिनाभर कोरोनामुक्त असलेल्या तालुक्यांमध्ये सुध्दा आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ६९७१८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी तपासणी करण्यात आले. यापैकी ५७९७८ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ६८२५६ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ६२०६४ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४३८९ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १४१०८ बाधितांनी मात केली आहे. सद्यस्थितीत ९६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ११ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
......
संसर्ग वाढतोय काळजी घ्या
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र जिल्हावासीयांनी ही बाब अद्यापही गांभीर्याने घेतली नाही. कोरोनाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे पुन्हा कोरोना विस्फोटाला आमंत्रण देणारे ठरत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
.....