आधी मतदान नंतर लग्न ..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:39 PM2018-05-28T22:39:50+5:302018-05-28T22:40:00+5:30
मतदान हे राष्ट्रीय कार्य आहे. लोकशाही पद्धतीत सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आपण केलेल्या अमुल्य अशा मतदानाने देशाचे भाग्य ठरविले जाते. प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावा म्हणून शासन स्तरावरुन जनजागृती केली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : मतदान हे राष्ट्रीय कार्य आहे. लोकशाही पद्धतीत सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आपण केलेल्या अमुल्य अशा मतदानाने देशाचे भाग्य ठरविले जाते. प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावा म्हणून शासन स्तरावरुन जनजागृती केली जाते. बहुमुल्य मतदानाचे भागीदार होऊन राष्ट्रीय कार्यात आपणही हातभार लावावा, या भावनेतून येथील एका उपवर तरुणाने नवरदेवाच्या वेशामध्येच येथील मतदान केंद्रावर जावून मतदान केले.
बोंडगावदेवी येथील रहिवासी असलेला राकेश ईश्वर साखरे या तरुणाचे सोमवारी (दि.२८) सकाळी ११.१० वाजता लग्न होते. छत्तीसगड राज्यातील डोंगरगढ येथील वधूशी विवाह निश्चित होता. गावापासून लग्न स्थळाचे अंतर फार असल्याने सकाळीच वरात जाणार होती. परंतु सोमवारी मतदान असल्याने आधी मतदान नंतर वरात काढू अशी ईच्छा राकेशने व्यक्त केली. चक्क नवरदेव येथील मतदान केंद्र क्रमांक २०२ वर गेला व मतदानाचा हक्क बजाविला. त्यानंतर लग्नासाठी डोंगरगडला रवाना झाला. राष्टÑीय कार्याची जाण ठेवून मतदानाला पहिली पसंती दिल्याने त्या नवरदेव युवकाचे कौतुक केले जात आहे.