सभापतिपदावरून फिस्कटली बोलणी?

By admin | Published: July 31, 2015 01:58 AM2015-07-31T01:58:37+5:302015-07-31T01:58:37+5:30

जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा काँग्रेसने भाजपचा हात पकडत विषय समित्यांचे सभापतीपद पदरात पाडून घेतले.

Fiscal talk of the chairmanship? | सभापतिपदावरून फिस्कटली बोलणी?

सभापतिपदावरून फिस्कटली बोलणी?

Next

काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचे प्रयत्न निष्फळ : काँग्रेसचे पी.जी.कटरे-विमल नागपुरे, भाजपचे देवराज वडगाये-छाया दसरे सभापती
गोंदिया : जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा काँग्रेसने भाजपचा हात पकडत विषय समित्यांचे सभापतीपद पदरात पाडून घेतले. चारपैकी बांधकाम आणि महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद काँग्रेसला तर भाजपने समाजकल्याण आणि कृषी हे खाते घेण्यावर समझोता करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र दोन सभापती दिले तरी ते महत्वाच्या समित्यांचे मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत अर्थ व बांधकाम खाते सोडायचे नसल्यामुळे त्यांच्यात सूत जुळले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तर दुसरीकडे काँग्रेसने केवळ ते निमित्त केले असून त्यांना राष्ट्रवादीला सोबत घ्यायचेच नव्हते, असाही सूर व्यक्त केला जात आहे.
या निवडणुकीत बालकल्याण सभापती म्हणून काँग्रेसच्या विमल अर्जुनी नागपुरे आणि समाजकल्याण सभापती म्हणून भाजपचे देवराज वडगाये यांची निवड बहुमतांनी झाली. याशिवाय बांधकाम आणि कृषी समित्यांच्या सभापतीपदासाठी काँग्रेसचे पी.जी.कटरे आणि भाजपच्या छाया आत्माराम दसरे यांची निवड झाली. यापैकी कोणते खाते कोणाला द्यायचे याचा अधिकृत निर्णय जि.प.अध्यक्ष घेणार आहेत. मात्र कटरे यांच्याकडे बांधकाम आणि दसरे यांच्याकडे कृषी समितीचे सभापतीपद देण्याचा निर्णय झाल्याचे ‘आॅफ द रेकॉर्ड’ समजले.
दुपारी ३ वाजतापासून जिल्हा परिषदेच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, तहसीलदार संजय पवार, तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी निवडणूक प्रक्रियेला सुरूवात केल्यानंतर ३.१५ ते ३.३० पर्यंत नामांकन मागे घेण्याचा वेळ देण्यात आला. तीनही पक्षाच्या सदस्यांनी सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी नामांकन दाखल केले होते. मात्र नंतर समाजकल्याण समितीसाठी काँग्रेसचे विजय लोणारे यांनी तर महिला व बालकल्याण समितीसाठी भाजपच्या कमलेश्वरी लिल्हारे यांनी माघार घेतली. तसेच उर्वरित दोन विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी भाजपचे शोभेलाल कटरे व काँग्रेसचे गिरीश पालीवाल यांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे चारही सभापतीपदासाठी काँग्रेस व भाजपात आधीच सेटींग झाल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र चारही सभापतीपदासाठी आपले उमेदवार रिंगणात कायम ठेवले.
माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे गोंदियात दाखल झाल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होऊ शकते का, याबाबतची उत्सुकता कायम होती. त्यामुळे सभागृहाबाहेर उत्सुकतेपोटी बघ्यांची गर्दी जमली होती. दुपारी ४ वाजता एक-एक करीत चारही समित्यांसाठी सभापदाची निवडणूक झाली.
यात बालकल्याण सभापती विमल अर्जुनी नागपुरे यांना २८ तर राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी तुरकर यांना २० मते पडली. तसेच समाजकल्याण सभापती भाजपचे देवराज वडगाये यांना २८ तर राष्ट्रवादीचे मनोज डोंगरे यांना २० मते पडली. यावेळी काँग्रेसचे ५ सदस्य तटस्थ राहिले. याशिवाय इतर दोन समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे पी.जी.कटरे यांना २९ तर राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर यांना २० मते मिळाली. तसेच भाजपच्या छाया आत्माराम दसरे यांना २८ आणि राष्ट्रवादीचे सुरेश हर्षे यांना २० मते पडली. येथेही काँग्रेसचे अनुक्रमे ४ व ५ सदस्य तटस्थ राहिले. (जिल्हा प्रतिनिधी)
विरोधी पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्र्रेस समर्थपणे निभावणार
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी थोडक्यात या प्रकरणाचा घटनाक्रम पत्रकारांना सांगितले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सकाळी गोंदियात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी या नात्याने आ.राजेंद्र जैन यांच्याशी संपर्क केला. जैन यांनी आधी काँग्रेसने अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र एवढ्या लवकर हे शक्य नसल्याची अडचण माणिकरावांनी सांगितल्यानंतर अध्यक्षपद तुम्ही ठेवत असाल तर तीन सभापदीपद आम्हाला द्या, असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या वतीने ठेवण्यात आला. मात्र तीन नसले तरी दोन-दोन सभापतीपद देण्यावर माणिकरावांनी तयारी दर्शविली होती. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून याबाबत कोणताच निरोप आला नाही, असे परशुरामकर यांनी सांगितले. काँग्रेस आणि भाजपातील ही युती वरिष्ठ स्तरावरूनच झाली होती, असा आमचा संशय असून आम्ही आता विरोधकांची भूमिका सक्षमपणे निभावणार, कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे किंवा नेत्यांचे मनसुबे साध्य होऊ देणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
काँग्रेसचे पाच सदस्य राहिले तटस्थ
सभापतीपदाच्या या निवडणुकीत तटस्थ राहिलेल्या पाच सदस्यांमध्ये दीपक पवार, विठोबा लिल्हारे, सीमा मडावी, शेखर पटले आणि विजय लोणारे या पाच जि.प.सदस्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे यातील चार सदस्य गोंदिया तालुक्यातील आहेत. त्यामुळे हे सदस्य पक्षादेश धुडकावल्याच्या कारवाईतून सुटू शकतात.
अध्यक्ष उषाताईंचे ‘नो कॉमेंट्स’
या निवडणुकीनंतर सभागृहातून बाहेर आलेल्या सदस्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढेही होत्या. त्यांना पत्रकारांनी झालेल्या घडामोडींबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ‘नो कॉमेंट्स’ म्हणत त्यांनी पत्रकारांपासून या मुद्द्यावर दूर राहणेच पसंत केले.

Web Title: Fiscal talk of the chairmanship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.