मत्स्य व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Published: August 20, 2016 12:51 AM2016-08-20T00:51:23+5:302016-08-20T00:51:23+5:30
नगर परिषदेच्या मागील भागात अनेक वर्षांपासून मासोळी बाजार भरतो. नगर परिषद त्या विक्रेत्यांकडून करसुद्धा वसूल करते.
मासोळी बाजार संकटात : स्वच्छतेसाठी विक्रेत्यांचा आंदोलनाचा इशारा
गोंदिया : नगर परिषदेच्या मागील भागात अनेक वर्षांपासून मासोळी बाजार भरतो. नगर परिषद त्या विक्रेत्यांकडून करसुद्धा वसूल करते. मात्र या बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून तेथील दृश्य अत्यंत किळसवाणे असते. दुर्गंधीने या व्यावसायिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. नगर परिषदेच्या दुर्लक्षावर रोष व्यक्त करीत मत्स्य व्यावसायिकांनी मंगळवारी बाजार बंद ठेवल्याची माहिती आहे.
सदर मत्स्य बाजार परिसराची पुढील तीन दिवसांत संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी अन्यथा नगर परिषदेच्या फाटकासमोरच दुकानदारी मांडू, असा इशारा ढिवर समाज मच्छी मार्केट कृती समितीने दिला आहे.
या विक्रेत्यांकडून नगर परिषद दररोज प्रत्येकी १० रूपये कर वसूल केला जातो. मात्र नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे बाजार परिसरात मोठीच अस्वच्छता पसरलेली आहे. त्याकडे अधिकारी-पदाधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र चिखल व दुर्गंधीने कहर केला आहे. घाण दुर्गंधामुळे खरेदीदार त्रस्त झाले असून विक्रेत्यांनाही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत गोंदिया ढिवर समाज मच्छी मार्केट कृती समितीच्या वतीने लेखी निवेदन नगर परिषदेला देण्यात आले आहे. परंतु त्याकडे पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे.
सदर बाजार परिसरात विद्युतची कसलीही सोय नाही. मत्स्य विक्रेत्यांना बसण्यासाठी ओटेसुद्धा नाहीत. त्यामुळे त्यांना रस्त्यावरच बसून मासोळ्या विक्री कराव्या लागतात. त्यांच्या व्यवस्थेसाठी नगर परिषदेने एका बोअरवेलची सोय तेथे केली आहे. परंतु ही बोअरवेलसुद्धा घाणीच्या विळख्यात सापडली असून तेथून दूषित पाणी निघत असल्याचा आरोपही विक्रेत्यांनी केला आहे. बोअरवेलकडे जाणाऱ्या मार्गावर चिखल साचले असून ती केवळ शोभेचीची ठरली आहे.
परिसरात नगर परिषदेने स्वच्छता करावी व सोयीसुविधा पुरवाव्यात, यासाठी विक्रेत्यांनी मंगळवारी बाजार बंद ठेवला. बाजारातील ५० विक्रेत या बंदमध्ये सहभागी झाले होते. गोंदिया ढिवर समाज कृती समितीच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला.
तीन दिवसांत नगर परिषदेने यावर तोडगा न काढल्यास नगर परिषदेच्या फाटकासमोर दुकानदारी थाटू, असा इशाराही विक्रेत्यांनी दिला आहे. बंदमध्ये समितीचे अध्यक्ष प्रेम मौजे, सचिव महेश राऊत, सहसचिव नरेश भोयर, कोषाध्यक्ष राजू मेश्राम, कार्याध्यक्ष शैलेश नान्हे व सदस्य सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)