मत्स्यव्यवसाय आॅक्सिजनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 10:14 PM2017-09-12T22:14:21+5:302017-09-12T22:14:21+5:30
यंदा जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ सरासरीच्या ५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या व मध्यम जलाशयांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ सरासरीच्या ५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या व मध्यम जलाशयांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. तर ९० टक्के तलावांमध्ये पाणीच नसल्याने जिल्ह्यातील मत्यपालन व्यवसाय आॅक्सिजनवर असल्याचे बिकट चित्र आहे.
तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. जवळपास जिल्ह्यातील प्रत्येक गावात तलाव आहे. या तलावांचा उपयोग शेतीसाठी सिंचन आणि मत्सपालनासाठी केला जातो. यावर शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने धानपिके धोक्यात आली असून एकंदरीत जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. कमी पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला बसला आहे.
मत्स्य व्यवसाय विकास विभागाने नुकतेच जिल्ह्यातील मत्स्यपालन तलावांचे सर्वेक्षण केले. त्यात ९० टक्के तलावांमध्ये पाणीसाठा नसल्याचे आढळले. या विभागातर्फे तालुकानिहाय माहिती संकलीत करण्याचे काम सुरू असून पावसाअभावी किती मत्स्यपालन संस्था व मत्स्य व्यावसायीकांचे नुकसान झाले. याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरच नुकसानीचा योग्य आकडा मिळण्याची शक्यता आहे.
कमी पावसाअभावी बरेच तलाव अद्यापही भरलेले नाहीत. सध्या ज्या तलावांमध्ये थोड्या फार प्रमाणात पाणी आहे ते देखील जानेवारीपर्यंत संपण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे हे तलाव मत्स्यपालनासाठी उपयोगात येणार नाही. तलावात पाणीच नसेल तर मत्स्यबीज सोडायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सप्टेंबर महिन्यात मत्स्य बीज केंद्रावर मत्स्यबीज उपलब्ध करुन दिले जातात. मात्र पाऊस न झाल्यास मत्स्यबीज उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे मत्स्य विकास विभागाचे एस.पी.वाटेगांवकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पावसाअभावी मत्स्यपालन व्यवसाय संकटात आल्याने त्यावर आधारित शेकडो कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील मत्स्यपालन तलावांची माहिती घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या २५ वर्षांत प्रथमच कमी पावसाची नोंद
जून ते १० सप्टेंबर या कालावधील जिल्ह्यात ७१२ मिमी.पावसाची नोंद झाली. ते सरासरीच्या केवळ ५४ टक्के आहे. पावसाळा जवळपास संपत आला असून गेल्या २५ वर्षांत प्रथमच ऐवढ्या कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे.
३९ तलावांची निविदा प्रक्रिया सुरू
मत्स्य विकास विभागाचे जिल्ह्यात ६६ तलाव आहेत. यापैकी ३९ तलावांमध्ये मत्स्यपालन केले जाते. हे तलाव निविदा काढून मत्स्यपालनासाठी दिले जातात. यंदा पाऊस कमी झाल्याने तलावांच्या निविदा प्रक्रियेवर देखील परिणाम झाला आहे. ३९ तलावांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
१० हजार मेट्रीक टन उत्पादन
२०१६-१७ या वर्षांत जिल्ह्याला ११ हजार ११० मेट्रीक टन मत्स्य उत्पादनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातुुलनेत यापैकी १० हजार ९४५ मेट्रीक टन मत्स्य उत्पादन झाले. जिल्ह्यातील मत्स्यपालन तलावांच्या माध्यमातून ४० लाख ५० हजार मत्स्यबीज उत्पादनाचे उद्दिष्ट होते. यापैकी प्रत्येक्षात ४१ लाख ४२ हजार मत्स्यबीज उत्पादन झाले होते. मात्र यावर्षी यात मोठी घट होण्याची शक्यता आहे.