पाचवीच्या भूगोलाचे पाच धडे गायब
By admin | Published: August 1, 2015 02:10 AM2015-08-01T02:10:43+5:302015-08-01T02:10:43+5:30
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेच्या वतीने निर्मित पाचव्या वर्गाच्या भूगोल विषयाच्या काही ..
सदोष पुस्तकांचे वापट : शिक्षण विभाग अनभिज्ञ
गोरेगाव : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेच्या वतीने निर्मित पाचव्या वर्गाच्या भूगोल विषयाच्या काही पुस्तकातील पाच धडेच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. स्थानिक शहीद जान्या-तिम्या जि.प.शाळेत असे सदोष पुस्तक विद्यार्थ्याना वाटप झाल्याचे आढळले. या प्रकारामुळे शिक्षण विभागाकडून प्रकाशित पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
विशेष म्हणजे ही बाब त्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतू शिक्षकाने ही बाब गांभिर्याने घेतली नाही. त्यामुळे या प्रकाराबाबत शाळेकडून कोणतीही तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आलेली नाही.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० नुसार राज्याचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमांतर्गत २०१३-१४ या शालेय वर्षापासून भूगोल विषयाचे हे पाठ्यपुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यातील काही पुस्तकातील मधातले पाच धडेच गायब असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे सदर पुस्तक साऱ्या महाराष्ट्रात वाटल्या गेल्याने विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन कसे करावे असा प्रश्न विद्यार्थी-पालकांना पडला आहे. या पुस्तकातून गायब झालेले पाच धडे कसे काय गायब झाले हा संशोधनाचा विषय आहे.
हा मुद्रणकीत दोष असला तरी तो कसा झाला? याची चौकशी होणार का? असे प्रश्न काही पालकांनी उपस्थित केले.
पाच धडे गायब असल्याचा प्रकार जाम्या-तिम्या शाळेतील प्रतिक राज बोम्बार्डे या पाचव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. यावर विद्यार्थ्यांने सदर बाब वर्ग शिक्षकांच्या लक्षात आणून दिली. पण वर्ग शिक्षकाने काही नाही होत असे बोलून त्याकडे दुर्लक्ष केले आणि ही बाब दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिक बोम्बार्डे या विद्यार्थ्यांने सदर बाब आपल्या पालकाला सांगितली. यावर पालक राज बोम्बार्डे यांनी जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे याबाबत तोंडी तक्रार केली.
गोंदिया जिल्ह्यात भूगोल विषयाच्या पाचव्या वर्गासाठी लाखो पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत. यातील किती पुस्तके दोषपूर्ण आहेत याविषयी शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे. ग्रामीण भागात अशाच पद्धतीने सदोष पुस्तकांचे वाटप झाले असण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)