यादवच्या बंदोबस्तातील पाच पोलीस निलंबित
By admin | Published: April 22, 2016 03:38 AM2016-04-22T03:38:45+5:302016-04-22T03:38:45+5:30
राष्ट्रवादी कांग्रेसचे नगरसेवक व माजी उपाध्यक्ष पंकज यादव यांच्यावर १५ एप्रिल रात्री ८.३५ वाजता प्राणघातक हल्ला
गोंदिया : राष्ट्रवादी कांग्रेसचे नगरसेवक व माजी उपाध्यक्ष पंकज यादव यांच्यावर १५ एप्रिल रात्री ८.३५ वाजता प्राणघातक हल्ला करण्यात आला. पंकज यादववर निगराणी ठेवण्यात आलेल्या पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा ठपका ठेवत पाच पोलीसांना पोलीस अधिक्षकांनी बुधवार (दि.२०) रोजी निलंबित केले आहे.
१३ जून २०१५ रोजी शहराच्या तहसील कार्यालय समोरील आंबेडकर पुतळ्याजवळ सफाई कामगारांचा नेता छेदीलाल इमलाह यांचा गोळी मारून खून करण्यात आला. त्या खूनाच्या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आले होते. त्याच हत्याकांडात आरोपी म्हणून पोलीसांनी पंकज यादवला अटक करण्यात आली होती.या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या पंकज यादवची प्रकृती खालावल्यामुळे उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी रामनवमीच्या दिवशी आरोपींनी पंकज यादव वर गोळीबार करून ठार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकच पोलीस शिपाई हजर होता. परंतु त्या पोलीस शिपायाला त्या खोलीच्या बाहेर राहून पहारा द्यायला हवे होते. परंतु तो खोलीत असल्यामुळे हा हल्ला झाल्याचे गृहीत धरून त्यालाही निलंबित करण्यात आले.
पंकज यादव न्यायालयीन कोठडीतील आरोपी असल्याने त्याच्या निगरानीसाठी पाच पोलिसांची ड्युटी लावण्यात आली होती. त्यात कमांडर म्हणून हवालदार इंदल आडे (बक्कल नंबर ४८५), नायक पोलिस शिपाई धीरज दिक्षीत (बक्कल नंबर ८६०), पोलिस शिपाई दुर्योधन मारबते (बक्कल नंबर १७८), नायक पोलिस शिपाई जागेश्वर उईके (बक्कल नंबर ११२०), महेश तांडेकर (बक्कल नंबर २११७) यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
परंतु या सर्वांच्या उदासिनतेमुळे पंकज यादववर हल्ला झाल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. निलंबन काळात त्यांना देवरीच्या पोलीस उपमुख्यालयात जोडण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)