पाच उपोषणकर्ते रुग्णालयात दाखल
By admin | Published: April 8, 2016 01:34 AM2016-04-08T01:34:06+5:302016-04-08T01:34:06+5:30
स्थानिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसलेल्या पाच इसमांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अर्जुनी मोरगाव : स्थानिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसलेल्या पाच इसमांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्यापही पाच उपोषणकर्त्यांचे उपोषण सुरूच आहे. येत्या १ ते २ दिवसात यावर तोडगा निघाला नाही तर उर्वरित उपोषणकर्त्यांना रुग्णालयात हलविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महालगाव येथील समाजमंदिराला लागून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धाच्या मूर्त्या मांडण्यात आल्या. या मूर्त्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी महालगाव येथील १० लोकांनी ३० मार्चपासून स्थानिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आरंभले. आज उपोषणाचा नववा दिवस आहे. प्रशासनातर्फे अद्यापही या मागणीवर कोणताच तोडगा निघू शकला नाही.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. मात्र उपोषणकर्ते रुग्णालयात दाखल होण्यासाठी तयार नाहीत. बुधवारी रात्री सुमारे ९ वाजताचे सुमारास पोलिसांनी उपोषणकर्त्यांची रुग्णालयात दाखल होण्यासाठी विनवणी केली. नकार दर्शविल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच उपोषणकर्ते दाखल झाले. मात्र उपोषणकर्ते उपोषणस्थळी परत आले. रुग्णालयात दाखल झालेल्यात दिनेश उदाराम मारगाये, बाबुराव धर्मा भोयर, रामदास रघुनाथ नाईक, रावजी अर्जुन मारगाये व यशवंत चेपटू चुलपार यांचा समावेश आहे. पुंडलिक मारगाये, योगेश मारगाये, मुकेश नाईक, चिंतामण राणे व उद्धव भोयर हे अद्यापही आमरण उपोषणावर आहेत. (तालुका प्रतिनिधी)