मेंदिपूरसह पाच गावे मृत्यूच्या छायेत
By admin | Published: June 30, 2017 01:30 AM2017-06-30T01:30:16+5:302017-06-30T01:30:16+5:30
तिरोडा तालुक्यात अदानी पॉवर प्लांट अस्तित्वात आले. त्यामुळे क्षेत्राच्या विकासासोबत परिसरातील नागरिकांचाही हितलाभ होईल,
पीडित नागरिकांची खंत : पांढरी धूळ सरळ लोकांच्या घरात व रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया/काचेवानी : तिरोडा तालुक्यात अदानी पॉवर प्लांट अस्तित्वात आले. त्यामुळे क्षेत्राच्या विकासासोबत परिसरातील नागरिकांचाही हितलाभ होईल, असे वाटत होते. पण नागरिकांचा अपेक्षाभंगच होत आहे. मेंदिपूरसह पाच गावे मृत्यूच्या छायेत जगत असून, प्रकल्प आपल्या मृत्यूचे परवाने घेवून आल्याची खंत पीडित नागरिक व्यक्त करीत आहेत.
खंत व्यक्त करणाऱ्यांमध्ये मेंदिपूर, भिवापूर, उधईटोला, गुमाधावडा, बरबसपुरा व काचेवानी गावांतील नागरिकांचा समावेश आहे. प्लांट तयार होत असल्यापासूनच सदर गावांसह काचेवानी रेल्वे परिसर व बरबसपुरा रेल्वे गेट येथील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला.
मुंबई मंत्रालयात झालेल्या करारनाम्यात पुनर्वसीत जागेची मंजुरी पाच वर्षांपूर्वी घेण्यात आली. त्यात मेंदिपूर, गुमाधावडा व काचेवानी ग्रामपंचायतच्या जागेची प्रस्तावित यादी देण्यात आली होती. त्याला शासनाने मंजुरीही दिली. परंतु आज पाच ते सहा वर्षे लोटूनही त्यांना पुनर्वसन देण्यात आले नाही.
गुमाधावडा ग्रामपंचयतच्या हद्दीतील उधईटोला गावाचे पुनर्वसन करण्याचे अदानी पॉवरने प्रयत्न केला होता. परंतु तेथील नागरिकांना काही अटीशर्ती मान्य नसल्याने नाकारले. करारनाम्यानुसार त्यांच्या काही मागण्या होत्या.
परंतु अदानी पॉवरने त्या धुतकारल्याने पुनर्वसन फिस्कटले. आजही उधईटोलावासी त्रासात व प्रदूषणात जीवन जगत आहेत. जवळची मेंदिपूर व भिवापूर ही गावे तर पॉवर प्लांटच्या मृत्यूच्या छायेत अडकले आहेत.
मेंदिपूर, भिवापूर आणि बरबसपुरा या परिसराकडे अदानी पॉवर प्लांटमधून निघणारी आस (जळालेल्य कोळशाची राख) साठवणुकीसाठी मोठमोठे साधन तयार करण्यात आले. यात आस ठेवल्यामुळे थोडाशा वाऱ्यानेही संपूर्ण पांढरी धूळ रस्त्यात व लोकांच्या घरी शिरते. नागरिकांच्या शरीरातही प्रवेश करते. याचा परिणाम आता दिसून येत नसला तरी काही दिवसात मेंदिपूर-भिवापूरसह अनेक गावात गंभीर परिणाम होतील, ही बाब नाकारता येत नाही.
आधीच दोनतीन गावे त्रासात असताना आस साठवणूक टाका तयार करण्यासाठी नुकतेच केंद्र शासनाने वनविभागाची १२५ हेक्टर जमीन अदानी पॉवरला दिल्याची माहिती आहे. असे झाल्यास बरबसपुरा गावाला त्रासच नव्हे तर मृत्यूच्या आमंत्रणाशी संघर्ष करावा लागणार आहे.
या पॉवर प्लांटच्या समस्यांची जाणीव व गंभीर परिणामाची चिंता कोणालाही दिसून येत नाही. तसेच कंपनीचे व्यवस्थापनसुद्धा याचा विचार करीत नाही.
मेंदिपूरवासी असेही कंगाल
अदानी पॉवरने स्थार्थासाठी प्रशासन व स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरुन अनेक लोकांना कंगाल बनविले. टिकारामटोला, रामाटोला, मेंदिपूर, काचेवानी, गुमाधावडा येथील नागरिकांनी आपल्या उदरनिर्वाहाची जमीन देवून स्वत: बेरोजगार व भिकारी झाले. रामाटोला व टिकारामटोला यांना पुनर्वसन देवून राहण्याचे साधन दिले. त्यांच्या जीवाला धोका नसून कसे तरी मोलमजुरी करून जीवन जगू शकतात. मात्र मेंदिपूरवासी जमिनी दिल्याने कंगाल तर झालेच, आता धूळ खात आजाराने ग्रसीत होवून मृत्यूचे शिकार होण्याची शक्यताच अधिक आहे, हे प्रशासनाला कसे दिसून येत नाही?
आता जनतेला जागृत होण्याची गरज
एकासुद्धा नागरिकाच्या जीवनाची व संरक्षणाची जबाबदारी शासनाची आहे. शासनकर्ते जनतेमुळेच निर्माण झाले. त्यामुळे अदानी पॉवर प्लांटच्या अन्यायाकडे त्यांनी लक्ष घालावे. पीडित जनतेकडे लक्ष देण्यात आले नाही तर जनतेचा विश्वासघात होईल. त्या जनतेला कधीतरी जाग येईलच. आज कितीतरी नेत्यांच्या शब्दांना मान दिले जात नाही. राजकारणात असल्याचे कारणे सांगून कामावरून बंद केले जाते. संघटनेच्या नावाखाली कंपनीतून पळविले जाते. स्थानिकांना काम दिले जात नाही. अशा समस्या असून आपल्या क्षेत्राचा आपणच विनाश केला, याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.