गृहविलगीकरणातील रुग्णांच्या मदतीला धावून आले पाच युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:43+5:302021-06-04T04:22:43+5:30
गोंदिया : कोरोना संक्रमण काळात गोंदिया शहरातील अनेक कुटुंब कोरोनाबाधित झालेले होते. अशात घरी जेवण तयार करणारासुद्धा कुणी नव्हता. ...
गोंदिया : कोरोना संक्रमण काळात गोंदिया शहरातील अनेक कुटुंब कोरोनाबाधित झालेले होते. अशात घरी जेवण तयार करणारासुद्धा कुणी नव्हता. त्यामुळे गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. अशात शहरातील पाच युवकांनी पुढे येत हम है दोस्त सेवा समितीच्या माध्यमातून गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना दोन वेळच्या जेवणाचा मोफत पुरवठा करून आधार दिला. युवकांच्या या उपक्रमाची सध्या सोशल मीडियावर जोमात चर्चा सुरू आहे.
अनेकदा संकटकाळात नातेवाईक किंवा जवळचे धावून येत नाहीत, असा अनुभव अनेकांचा आहे, तर बरेचदा ओळखपाळख नसलेल्या व्यक्तीसुद्धा मदतीला धावून येतात. संकटकाळात धावून येणाराच खरा मित्र आणि नातेवाईक असतो, असे म्हटले जाते. ते खरेदेखील आहे. कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांनी याचा अनुभवसुद्धा घेतला आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली. दररोज हजारो कोरोनाबाधितांची नोंद होत होती. कमी प्रमाणात लागण असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टर देत होते. मात्र, अशा परिस्थितीतदेखील घरातील महिलेला जर कोरोनाची लागण झाली असेल, तर घरातील स्वयंपाक कोण करेल, लहान मुलांकडे लक्ष कोण देणार, असा प्रश्न होत होता. अशा लोकांच्या मदतीला गोंदियातील पाच मित्र धावून आले. त्यांनी हम है दोस्त सेवा समिती गठीत केली. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना दोन वेळचे मोफत जेवण देण्याचा निर्णय घेत त्याची सुरवात केली, तर इतर मित्रांनीदेखील त्यांच्या या उपक्रमात सहभाग घेतला. अल्पावधीतच त्यांच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि मदतीसाठीसुद्धा अनेक हात पुढे येऊ लागले.
.............
पाच डब्यांपासून केली सुरुवात
सुरुवातीला गृहविलगीकरणात असलेल्या पाच रुग्णांच्या घरी नि:शुल्क जेवणाचे डबे पोहोचविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर याला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे पाच डब्यांपासून सुरू केलेला उपक्रम आज ३०० डब्यांच्यावर गेला आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाची चर्चा सोशल मीडियावर होताच अनेक गुप्त दान करणारे लोक समोर येत आहेत. हम है दोस्त सेवा समितीला मदत करीत आहेत. बाधित रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी डॉक्टरदेखील त्यांच्या या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
........
जेवणात दिले जात आहेत हे पदार्थ
हम है दोस्त समितीच्या माध्यमातून गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना नि:शुल्क जेवणाची व्यवस्था केली जात आहे. जेवणात नियमित सलाद, पापड, भाजी, वरण, पोळी, भात, लोणचं, गोड पदार्थ दोन्हीवेळा दिले जाते. जेवणाचा दर्जा चांगला राहील याची काळजीसुद्धा हम है दोस्त सेवा समितीचे रोनक सिंघानिया, डॉ. विनोद बडोले, लुपेश मेश्राम, रवी डागा, प्रदीप सोनी, महेश सोनछात्र, अर्पित अग्रवाल हे युवक घेत आहेत.
....................
कोट :
कोरोनाकाळात रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना अनेकांनी मोफत जेवण दिले. मात्र, कोरोनाबाधित झाल्यावर घरपोच मोफत जेवण देण्याचा हा अनोखा उपक्रम गोंदिया जिल्ह्यात प्रथमच पहावयास मिळत आहे. या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या युवकांचे कार्य कौतुकास्पद आहे.
- विनोद दास, नागरिक.