मुंंबईमध्ये फडकला गोंदियाचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:16 PM2019-01-22T22:16:11+5:302019-01-22T22:17:10+5:30
मुंबई येथे रविवारी (दि.२०) पार पडलेल्या राष्ट्रीय मॅराथॉनमध्ये जिल्ह्यातील १३२ मुलांमुलींनी भाग घेत मुंबईतही गोंदियाचा झेंडा फडकविला. मॅराथॉनमध्ये विविध गटांत उत्कृष्ट कामगिरी करून परत आलेल्या या खेळाडूंचे मंगळवारी (दि.२२) रेल्वे स्थानकावर पोलीस विभागाकडून जंगी स्वागत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुंबई येथे रविवारी (दि.२०) पार पडलेल्या राष्ट्रीय मॅराथॉनमध्ये जिल्ह्यातील १३२ मुलांमुलींनी भाग घेत मुंबईतही गोंदियाचा झेंडा फडकविला. मॅराथॉनमध्ये विविध गटांत उत्कृष्ट कामगिरी करून परत आलेल्या या खेळाडूंचे मंगळवारी (दि.२२) रेल्वे स्थानकावर पोलीस विभागाकडून जंगी स्वागत करण्यात आले.
नक्षलग्रस्त आदिवासी भागातील खेळाडूंना मुंबईच्या राष्ट्रीय मॅराथन स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी महात्मा गांधी जयंती निमीत्त २ आॅक्टोबर रोजी पोलीस विभागातर्फे अहिंसा मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ही मॅराथॉन ४ तास ५८ मिनीटांत पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय मॅराथन मध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. १२ मुलांना ५ डिसेंबर ते १८ जानेवारी दरम्यान नाशीक येथे प्रशिक्षण देण्यात आले. पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी पुढाकार घेऊन त्या मुलांना विशेष प्रशिक्षण देण्याची सोय करून दिली होती. गोंदियात २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या अहिंसा मॅरेथान स्पर्धेत ७ हजार ६२० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातील १३२ स्पर्धेकांनी राष्ट्रीय मॅराथन स्पर्धेत सहभाग घेतला. प्रशिक्षणार्थ्यांना मुंबईला नेणे, राहणे, खाणे व परत येणे यासंदर्भात संपूर्ण व्यवस्था गोंदिया पोलीस विभागाने केली होती.
मुंबई येथे रविवारी (दि.२०) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सहभाग घेऊन यशही पटकाविले. पूर्ण मॅराथॉन पुरूष मध्ये ३०, पूर्ण मॅराथॉन महिलांमध्ये ३६, अर्धी मॅराथॉन पुरूष ८, अर्धी मॅराथॉन महिला १७, १० किमी. मॅराथॉन पुरूष ६१, १० किमी. मॅराथनॉमध्ये ६९ महिला अशा एकूण १३२ खेळाडूंचा सहभाग होता.
मुंबई मॅराथॉन वरून मंगळवारी (दि. २२) विदर्भ एक्स्प्रेसने सर्व खेळाडू परत आले असता रेल्वेस्थानकावर पोलिस विभागाच्या बँड पथकाने त्यांचे स्वागत करण्यात आले. विजयी खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक बैजल व अधिकाऱ्यांनी स्वागत केले.
यांनी पटकाविले पदक
अर्धी मॅराथॉन पुरूषांमध्ये २५ ते ३० वर्षे वयोगटात सुभाष लिल्हारे याने सहावा क्रमांक पटकाविला असून त्याने १ तास १४ मिनीट ८ सेकंद घेतले. १० किमी. पुरूषांमध्ये संदीप चौधरी याने द्वितीय क्रमांक पटकाविला असून त्याने ३६.३१ मिनीटांत स्पर्धा पूर्ण केली. १० किमी. २५ ते ३० वयोगटात पुरूषांमध्ये अमोल चचाने याने चौथा क्रमांक पटकाविला असून ४०.४४ मिनीटांत स्पर्धा पूर्ण केली. नरेंद्र ठाकरे याने ४०.५२ मिनीटांत स्पर्धा पूर्ण करून पाचवा क्रमांक पटकाविला. तर १० किमी. महिलांमध्ये काजल मरठे हिने ५०.२७ मिनीट घेऊन पाचवा क्रमांक पटकाविला.