जिल्ह्यात संततधार सुरूच, नदीनाल्यांना आला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 05:00 AM2022-07-14T05:00:00+5:302022-07-14T05:00:01+5:30
हवामान विभागाने जिल्ह्यात १० ते १४ जुलैदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे नदीनाले तुुडुंब भरुन वाहत होते. तर वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द, परसवाडा परिसरातील आठ ते दहा गावांतील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली होती. शेतकऱ्यांनी चार-पाच दिवसांपूर्वी केलेली रोवणी वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी (दि. १३) दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. संततधार पावसामुळे जिल्ह्यात आठही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून गेल्या चोवीस तासात ८३.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर दोन मार्गांवरील पूल वाहून गेल्याने या गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.
हवामान विभागाने जिल्ह्यात १० ते १४ जुलैदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे नदीनाले तुुडुंब भरुन वाहत होते. तर वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द, परसवाडा परिसरातील आठ ते दहा गावांतील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली होती. शेतकऱ्यांनी चार-पाच दिवसांपूर्वी केलेली रोवणी वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८३.३ मिमी पावसाची नोंद झाली असून आठही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तिरोडा, गोरेगाव, गोंदिया तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
संततधार पावसामुळे बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रोवणीची कामे काही प्रमाणात खोळंबली होती. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बुधवारी रात्री उशीरापर्यंत कायम होता. त्यामुळे नदी काठालगतच्या गावकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होवू शकते.