युवा पुरस्काराने उडान संस्था सन्मानित ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:34 AM2021-08-17T04:34:19+5:302021-08-17T04:34:19+5:30
गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार जिल्ह्यातील युवक-युवती व संस्थांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन ...
गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार जिल्ह्यातील युवक-युवती व संस्थांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन २०१९-२० या वर्षाचा युवा पुरस्कार आमगाव तालुक्यातील ग्राम पदमपूर येथील उडान बहूद्देशीय विकास संस्थेला पालकमंत्री नवाब मलीक यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी पोलीस मुख्यालयातील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, क्रीडा अधिकारी ए.डी.मरस्कोल्हे, राज्य क्रीडा मार्गदर्शक एन.एस.उईके, धनंजय बारसागडे, तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र शिंदे उपस्थित होते. उडान बहूद्देशीय विकास संस्थेला समाजसेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे शासनाचा युवा पुरस्कार म्हणून गौरवपत्र, सन्मानचिन्ह व ५० हजार रुपये रोख प्रदान करण्यात आले. संस्थेने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, पूरपीडितांना मदत, वृक्षारोपण, कोविड संकटात गरजूंना मदत, स्वच्छता मोहीम, प्लास्टिकमुक्ती संकल्पना, पाणी बचत, पक्षी बचाओ, चिनी वस्तूंचा बहिष्कार, एड्स जनजागृती, सिकलसेल जनजागृती, साक्षरता, ज्येष्ठांचा सन्मान, बालकांना त्यांचा हक्क, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, व्यसनमुक्त समाज, क्षयरोग जनजागृती, प्राण्यांना जीवनदान, वनराई बंधारा निर्मिती, निराधार, विधवा, परित्यक्ता यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करण्यासारखे कार्य केले.
हा पुरस्कार संस्थेचे कोषाध्यक्ष रविकांत पाऊलझगडे, अध्यक्ष आशिष तलमले, नरेश येटरे, प्रेमानंद पाथोडे, अतुल फुंडे, सचिन तलमले, दिनेश गिऱ्हेपुंजे, प्रिनल वंजारी, दीपक भांडारकर, नरेश बोहरे, रामभरोस चक्रवर्ती, मोहन ब्राम्हणकर, विजय कोरे, हिमालय राऊत, ज्ञानेश्वर खोटेले, प्रणय फुंडे, प्रवीण कोहळे, हरिश भुते, अरुण भुते, हार्दिक भुते, जीवन फुंडे, नरेश रहिले व इतरांनी स्वीकारला.