उड्डाणपुलाच्या फाईलचा आॅफिस टू आॅफिस प्रवास सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 08:52 PM2019-03-24T20:52:35+5:302019-03-24T20:53:13+5:30
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो पाडण्याचे निर्देश रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. याला आठ महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्यापही कुठलीच कारवाही करण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो पाडण्याचे निर्देश रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. याला आठ महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्यापही कुठलीच कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे उड्डाणपुलाच्या फाईलचा प्रवास मागील आठ महिन्यापासून केवळ आॅफिस टू आॅफिस असाच सुरू आहे.
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने उड्डाणपुलावरुन जड वाहतूक बंद केली. सध्या केवळ टू व्हिलर आणि थ्री व्हिलर वाहनांना प्रवेश दिला जात आहे. मात्र रेल्वे ट्रॅकच्या परिसरातील उड्डाणपुलाचा भाग पूर्णपणे जीर्ण झाला असून तेव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाला तीनदा पत्र देऊन जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करुन तो पाडण्याची सूचना केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करुन पुलाची थोडी डागडूजी केली.जुना जीर्ण उड्डाणपूल पाडूृन त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी ८४ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला. मात्र या प्रस्ताव अद्यापही कुठलाच विचार झाला नसून ही फाईल सुध्दा उघडून पाहण्यात आली नसल्याची माहिती आहे. मात्र यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुध्दा या फाईलचे नेमके काय झाले याचा पाठपुरावा केला नसल्याची माहिती आहे.केवळ शासनाकडे प्रस्ताव पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानली.
त्यामुळे शहरवासीयांवरील धोका कायम आहे. एखाद्या वेळेस हा पूल कोसळून एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न सुध्दा उपस्थित केला जात आहे.
रेल्वे प्रशासन हतबल
जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडण्यासंदर्भात रेल्वे विभागाने आत्तापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा पत्र व्यवहार केला. तसेच या विषयावर चार ते पाच बैठका घेतल्या. मात्र यानंतरही जिल्हा प्रशासनातर्फे जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी कुठलेच पाऊल उचलण्यात आले नसल्याने रेल्वे विभाग सुध्दा हतबल झाला आहे.
चारचाकी वाहनांची वाहतूक सुरूच
जुन्या उड्डाणपुलावर चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असला तरी या पुलावरुन चारचाकी वाहने सर्रासपणे धावत आहे.विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक पोलीस शिपाय देखील कर्तव्यावर राहत असून त्यांच्याच डोळ्यादेखत नियमाचे उल्लघंन करुन सर्रासपणे चारचाकी वाहने धावत आहे.
पाठपुराव्यासाठी कुणी पुढे येईना
शहरातील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी राजकीय वजनाची गरज आहे. मात्र मागील आठ महिन्यांपासून ८४ कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव मंत्रालयात धूळखात पडला आहे. मात्र यासाठी पाठपुरावा करण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
आचारसंहितेने काम लांबणीवर
सध्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने याचा उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला सुध्दा फटका बसल्याची माहिती आहे.पुन्हा दोन महिने पुलाच्या प्रस्तावावर विचार होण्याची शक्यता कमी असून तोपर्यंत शहरवासीयांना धोका पत्थकारावा लागणार आहे.