लोककलावंत विकताहेत भाजीपाला; सरकारी मदत केवळ नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:30 AM2021-08-15T04:30:19+5:302021-08-15T04:30:19+5:30
गोंदिया : लोककला जपणाऱ्या कलावंतांना आजघडीला खडतर जीवन जगावे लागत आहे. भजन, कीर्तन, दंडार, तमाशा, पोवाडा व ड्रामा, ...
गोंदिया : लोककला जपणाऱ्या कलावंतांना आजघडीला खडतर जीवन जगावे लागत आहे. भजन, कीर्तन, दंडार, तमाशा, पोवाडा व ड्रामा, अशा माध्यमांतून लोकांवर अभिनयातून छाप सोडणाऱ्या कलावंतांनी समाजजागृती केली. कधी सरकारच्या योजनांचा प्रचार-प्रसार, तर भारतीय संस्कृतीचे दर्शन लोककलेच्या माध्यमातून समाजाला सांगणारे कलावंत वृद्धावस्थेत असताना त्यांना शासनाचे अर्थसाहाय्य मिळणे आवश्यक आहे; परंतु शासनाच्या जाचक अटींमुळे अनेक कलावंतांना या लोककलावंतांसाठी असलेली तुटपुंजी मदतही मिळत नाही. त्यामुळे आज त्यांना भाजी विकणे, विड्या बांधणे, चणे-फुटाणे विकून पोटाची खळगी भरावी लागत आहे.
..................................
मदत हातात किती उरणार
- शासन लोककलावंतांना महिन्याकाठी प्रोत्साहनपर मदत म्हणून १५०० रुपये महिन्याकाठी देते; परंतु महागाईच्या काळात या तुटपुंजा मदतीतून लोककलावंत जीवन सांभाळू शकत नाहीत.
- महिन्याकाठी शासन ज्यांना मदत देते ती रक्कम जीवन जगण्यासाठी अपुरी आहे. त्यामुळे आपला संसार कसा चालवावा, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. ज्यांचे कुणी नाही आणि कामही होऊ शकत नाही, अशा कलावंतांनी काय करावे, हे त्यांना कळत नाही.
- कलावंतांना देण्यात येणारी मदत तुटपुंजी, त्यातच ४-४ महिने पैसे मिळत नसल्याने त्या वेळात त्यांनी जीवन कसे जगावे, हा प्रश्न आहे.
...................
राज्य सरकारची मदत कधी मिळणार
- राज्य सरकारने कोरोनाच्या काळात लोककलावंतांना आधार म्हणून ५ हजार रुपये मदत देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते.
- मदतीची घोषणा केल्यावरही व कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाही हे पैसे कलावंतांना राज्य सरकारने दिले नाहीत. त्यामुळे ते कलावंत संकटात आहेत.
- राज्य सरकारने निवड झालेल्या कलावंतांना ५ हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे; परंतु मदत मिळाली नाही. कलावंत म्हणून ज्यांचे नाव यादीत नाही अशा लोकांनी जीवन जगायचे कसे?
.....................
जिल्ह्यात ५०० कलावंत
-कलेच्या क्षेत्रात पारंगत असलेल्या लोकांची कलावंत म्हणून शासनाकडून यादी तयार करण्यात आली. आपल्या कलेत निपुण असलेल्या लोकांना शासन मदत करते.
- गोंदिया जिल्ह्यातील ५०० कलावंतांचे आतापर्यंत कलावंत म्हणून त्यांचे नाव शासनाच्या यादीत समाविष्ट आहेत.
- गोंदिया जिल्ह्यात लोककला जपणाऱ्या २०० लोकांची यादी प्रतीक्षेत आहे. मागील २ वर्षांपासून त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले नाही.
......................
कलावंतांची फरपट
१) मागील ४ वर्षांपासून मी समाजकल्याण विभागाकडे अर्ज केला; परंतु माझ्या अर्जावर कधी विचार होणार, हे सांगता येत नाही. जिल्हा मुख्यालयाला जाण्यासाठी माझ्याकडे पैसेही नाहीत. लोककला आयुष्यभर जपूनही शासन आता आम्हाला मदत करीत नाही.
-गीताबाई शेंडे, पदमपूर
...........
२) राज्य सरकारने कोविडच्या काळात लोककलावंतांना मदत करण्यासाठी ५ हजार रुपये देण्याची घोषणा केली; परंतु ही घोषणा हवेतच विरली काय? आम्हाला आताही ते पैसे मिळाले नाहीत.
-तुळशीराम हुकरे
.................
भजनाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन जनजागृती केली; परंतु लोककलावंत म्हणून शासनाने आमचा यादीत समावेश केला नाही. लाभ मिळवून देण्याच्या नावावर पैसे मागितले जातात. पैसे दिले नाहीत तर आम्हाला मदतही मिळाली नाही.
-पारबता डोये