शेतकऱ्यांची कामे वेळीच मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:23 PM2018-10-24T22:23:48+5:302018-10-24T22:25:35+5:30
सर्व विभाग प्रमुखांनी आपआपली कामे जबाबदारीने करावीत. जनहिताच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. शेतकरी आपल्या विविध कामासाठी शासकीय कार्यालयात आले असता त्यांची कामे वेळीच मार्गी लावण्याचे निर्देश खा.मधुकर कुकडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : सर्व विभाग प्रमुखांनी आपआपली कामे जबाबदारीने करावीत. जनहिताच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. शेतकरी आपल्या विविध कामासाठी शासकीय कार्यालयात आले असता त्यांची कामे वेळीच मार्गी लावण्याचे निर्देश खा.मधुकर कुकडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
येथील पंचायत समिती कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी सभापती निता रहांगडाले, उपसभापती मनोहर राऊत, पं.स.सदस्य किशोर पारधी, नत्थू अंबुले, माया शरणागत, उषा किंदरले, माया भगत, प्रवीण पटले, संध्या गजभिये, जया धावडे, रमणिक सोयाम, प्रदीप मेश्राम, ब्रिजलाल रहांगडाले, माया रहांगडाले, गटविकास अधिकारी डी.बी.हरिणखेडे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्र्रकाश गंगापारी उपस्थित होते. या वेळी सर्व विभाग प्रमुखांनी आपआपल्या विभागाचा अहवाल सादर केला.परंतु लघू पाटबंधारे विभाग व धापेवाडा उपसा सिंचन विभाग अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश खा. कुकडे यांनी दिले. सुकडी आरोग्य केंद्रातील गलथान कारभार पं.स.सदस्य किशोर पारधी यांनी बिल दाखवून कुकडे यांच्या निदर्शनात आणून दिला. सामान खरेदीचे बिले जोडली व पैसा काढल्याने लाग बुकची मागणी केली असता ते उपलब्ध करुन देण्यात आले नसल्याचे सांगितले.
मुंडीकोटा येथील रस्ता बांधकामाच्या मुद्यावर बैठकीत वादळी चर्चा झाली. बांधकामाच्या चौकशीचा निर्णय घेण्यात आला.
लोणारा येथील दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या रोजगार सेवकाचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, पीक विमा प्रश्नावर आमची जबाबदारी नाही हे काम बँकेचे असल्याचे सांगितले.यावर सभागृहातील सरपंच, शेतकरी भांडारकर, शरणागत, इंदोराचे सरपंच नितेश खोब्रागडे यांनी मुद्दा उचलून धरला. यावर चांगलीच खडाजंगी झाली. शेवटी खासदारांनी हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांची कामे झालीच पाहिजेत असे सांगितले. मनोरा ग्रामसेवकाचे प्रकरण चार महिन्यापासून प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर याप्रकरणी योग्य कारवाही करण्याचे निर्देश कुकडे यांनी दिले. गटविकास अधिकारी हरिणखेडे यांनी माहिती दिली. संचालन व आभार डॉ. प्रकाश गंगापारी यांनी मानले.