मे.स्वास्तिक पॅकर्सवर अन्न प्रशासनाची धाड, ८० टीन तेल जप्त
By नरेश रहिले | Published: September 22, 2022 07:19 PM2022-09-22T19:19:46+5:302022-09-22T19:25:34+5:30
गोंदियातील गुलशन अग्रवाल यांच्या मालकीचे असलेल्या फुलचूरपेठ येथील मे. स्वास्तिक रिफाईन पॅकर्स यामध्ये अस्वच्छ पुनर्वापर करण्यात येत असलेल्या टीनमध्ये रिफाईंड सोयाबीन तेल विक्री करीता साठवून ठेवण्यात आले होते.
गोंदिया - अधिक पैसा कमवण्याच्या नादात अनेकजण तेलाचा पुनर्वापर करतात. परंतु गोंदियाच्या आयटीआय फुलचूरपेठ येथील मे. स्वास्तिक रिफाईन पॅकर्स येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता धाड घालून अस्वच्छ असलेल्या टीनमध्ये रिफाईंड सोयाबीन तेल साठवले असल्याने ते ८० टिन तेल जप्त केला आहे.
गोंदियातील गुलशन अग्रवाल यांच्या मालकीचे असलेल्या फुलचूरपेठ येथील मे. स्वास्तिक रिफाईन पॅकर्स यामध्ये अस्वच्छ पुनर्वापर करण्यात येत असलेल्या टीनमध्ये रिफाईंड सोयाबीन तेल विक्री करीता साठवून ठेवण्यात आले होते. त्या ८० टीनमध्ये ११९८ किलो सोयबीन तेल होते. त्या तेलाची किंमत १ लाख ६६ हजार २१६ रूपये सांगितली जाते.
स्वास्तिक रिफाईंड पॅकर्सने अन्न सुरक्षा व माणके कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड घालून तो तेल जप्त केला. त्यातील नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. कलम ३८ अन्तर्गत कारवाई करून प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर पुढची कार्यवाही करण्यात येईल. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त ए.पी. देशपांडे, सहाय्यक आयुक्त अन्नपुरे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी शितल देशपांडे, महेश चहांदे यांनी केली आहे.
जून महिन्यात केली होती एक कारवाई
आता सणाचे दिवस असताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. जून महिन्यात माताटोली येथील जय बाबा ट्रेडर्सवरही कारवाई केली असल्याची माहिती शीतल देशपांडे यांनी दिली आहे.
खाद्यतेलाचा तळण्यासाठी वारंवार वापर करू नकासद्यस्थितीला बाजारपेठेत पाम तेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, सरकी तेल असे खाद्य तेल उपलब्ध आहेत. भारतात दररोज प्रति व्यक्ती सरासरी खाद्य तेलाचा वापर ५० ग्रॅम करतो. जागतिकीकरण व आधुनिकीकरण यामुळे मानवी जीवनशैलीत मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत व याचा परिणाम खाद्य संस्कृतीवरही झाला आहे. खाद्य तेलाचा तळण्यासाठी वारंवार वापर करू नका.
कुकिंग ऑईलमुळे बायोडिझेल निर्मिती
वारंवार तळण्यासाठी पुनर्वापर केलेल्या खाद्य तेलाचे मानवी शरीरावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण यांनी अशा खाद्य तेलातील हानिकारक पदार्थांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे व त्यापासून बायोडिझेल निर्मिती करून पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने रिपरपज युज कुकिंग ऑईल हा उपक्रम सुरू केला आहे.
असे होते दुष्परिणाम
खाद्यतेलाचा तळण्यासाठी वारंवार पुनर्वापर केल्याने त्यातील ट्रान्सफॅट्स व टोटल पोलार कंपाऊंडस यांचे प्रमाण वाढते. मर्यादेपेक्षा जास्त ट्रान्सफॅट्स व टोटल पोलार कंपाउंड यांचे सेवन केल्याने मानवी शरीरावर दुष्परिणाम होऊन हायपर टेंशन, यकृताचे आजार, धमनी काठिन्य, अल्झायमर इत्यादी गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
सध्या धकाधकीच्या जीवनामुळे दररोजच्या आहारातील फास्ट फूडचे व स्नॅक्स फुडचे प्रमाण वाढले आहे. सर्वसाधारणपणे फास्ट फूड व स्नॅक्स बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तळण्यासाठी खाद्य तेलाचा वापर होतो. अन्न पदार्थ खाद्य तेलात तळण्याची प्रक्रिया उच्च तापमानाला होते. या तापमानाला खाद्य तेलाचा तळण्यासाठी वारंवार पुनर्वापर केल्याने त्यामध्ये वेगवेगळ्या अभिक्रिया घडून येतात. यातून तेलाच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मातही बदल होतो. त्याचे पोषणमूल्य कमी होऊन गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होतो.
- शीतल देशपांडे अन्न सुरक्षा अधिकारी गोंदिया.