अन्न पदार्थांची तपासणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 08:38 PM2019-04-26T20:38:55+5:302019-04-26T20:39:46+5:30

उघड्यावरील खाद्य पदार्थ खाल्ल्याने पोटात आजार होण्याचा धोका असल्याने तपासणीचे कडक नियम तयार करण्यात आले. परंतु गोंदिया शहर व जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी अशी तपासणी केली जात नाही. परिणामी संबंधित विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

Food checks should be done | अन्न पदार्थांची तपासणी व्हावी

अन्न पदार्थांची तपासणी व्हावी

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांची मागणी : उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उघड्यावरील खाद्य पदार्थ खाल्ल्याने पोटात आजार होण्याचा धोका असल्याने तपासणीचे कडक नियम तयार करण्यात आले. परंतु गोंदिया शहर व जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी अशी तपासणी केली जात नाही. परिणामी संबंधित विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
उघड्यावरील विविध खाद्यपदार्थांचे आपण सेवन करतो. पण यातील अन्नघटक आरोग्यासाठी कितपत हितकारक व घातक आहे याची कल्पना नसते. त्यामुळेच अन्न पदार्थाची विविध निकषावर तपासणी करण्यासाठी शासनाने अन्न व औषध प्रशासन विभागाची यंत्रणा तयार केली आहे. गोंदिया शहरातील बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत आहे. विविध हॉटेल्स व रस्त्यावर अन्न पदार्थ विक्री केले जाते. पण नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, अन्न पदार्थापासून त्यांना कोणताही अपाय होऊ नये, याकरिता कठोर तपासणी करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या या यंत्रणेची जवाबदारी महत्वपूर्ण ठरते.
मात्र, जिल्ह्यात विभागाच्या कारवाया थंडावल्या आहेत. याचा गैरफायदा अन्न पदार्थ विकणारे विक्रेते घेत आहेत. असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याशिवाय खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करुन ग्राहकांच्या माथी मारण्याच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. यातून आर्थिक व आरोग्याचे नुकसान होत आहे. खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी संबंधित विभागाने कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
खाद्य तेलात भेसळीचे प्रमाण वाढले
दुग्धजन्य पदार्थासोबत खाद्यतेलात भेसळ करण्याच्या घटना उजेडात येत आहेत. खाद्य पदार्थात भेसळीचे प्रमाण वाढले. शासनाने तंबाखूजन्य पदार्थांची बंदी केली आहे. खर्रा विक्री करणाऱ्या पानठेला चालकांवर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे. पण, पानठेल्यांवर कारवाई करण्याची मोहिम थंडावली. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन संबंधित दोषी दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी ग्राहक करीत आहेत.
अपायकारक औषधींचा शोध घ्यावा
खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या हॉटेलांपासून तर पानठेला चालकांची नियमित तपासणी करावी लागते. खाद्य पदार्थ उघड्यावर बनविण्यास नियमानुसार सक्त मनाई आहे. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता आहे किंवा नाही यासंदर्भात अनेक बाबींची तपासणी केली जाते. दोष सिद्ध झाल्यास कारवाई होते. औषध विक्रेत्यांकडेही अपयकारक औषधी असण्याची शक्यता असल्याने कठोर तपासणीची गरज आहे.
कॉर्बाईडचा सर्रास वापर
सध्या बाजारात अपरिपक्क टरबूज, केळी, परराज्यातील आंबे मोठ्या प्रमाणात येत आहेत. ते सर्रासपणे कार्बाईडने पिकविले जातात. अन्न प्रशासनाच्या नियमानुसार ही कार्बाईडने पिकविलेली फळे आरोग्यास घातक असल्यामुळे ती विकताना आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला गजाआड केले जाते. परंतु शहरात ना कोणत्या फळविक्रेत्याची तपासणी होते, ना कुणावर कारवाई केली जाते.

Web Title: Food checks should be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न