१४ लाख लोकांची अन्नसुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:06+5:302021-01-18T04:27:06+5:30
गोंदिया : जिल्ह्यात आठ तालुके असून सर्व तालुक्यांत १४ लाखांवर लोक वास्तव्यास आहेत. परंतु, या लोकांची अन्न व औषध ...
गोंदिया : जिल्ह्यात आठ तालुके असून सर्व तालुक्यांत १४ लाखांवर लोक वास्तव्यास आहेत. परंतु, या लोकांची अन्न व औषध सुरक्षा वाऱ्यावर आहे. जिल्ह्यातील मेडिकल किंवा हॉटेलचीही तपासणी होत नाही. त्यामुळे हॉटेलचालक किंवा मेडिकलचालकांचा कारभार यावर या विभागाचे फारसे नियंत्रण नाही. गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यात ४५० हॉटेल्स आहेत. या हॉटेलातून विक्री होणाऱ्या पदार्थांवर बेस्ट बी फोर असणे आवश्यक आहे. असे केंद्र शासनाचे निर्देश असतानाही गोंदिया जिल्ह्यातील अनेक दुकानांतील पदार्थांवर बेस्ट बी फोर लिहिलेच जात नाही. या हॉटेलांची तपासणीच होत नसल्यामुळे हॉटेल मालक बिनधास्त वागत आहेत. जुने पदार्थ विक्रीला ठेवले जातात. मुदतबाह्य पदार्थ अनेक हॉटेलांमधून दिसून येतात. या हॉटेलांचीच तपासणी करणाऱ्यासाठी गोंदिया जिल्ह्याला दोन अन्न निरीक्षक आहेत. परंतु, त्यांनी केलेल्या जुन्या कारवायांच्या प्रक्रियेतच ते अडकून राहतात. हॉटेलांची कधी-कधी तपासणी होते परंतु मेडिकल तपासणी मागील दाेन वर्षांपासून झालीच नाही.
बॉक्स
औषध निरीक्षकच नाही
गोंदिया जिल्ह्यात ६०० पेक्षा अधिक मेडिकल स्टोअर्स आहेत. परंतु, जिल्ह्यातील या मेडिकल स्टोअर्सवर नजर ठेवण्यासाठी शासनाने एक औषध निरीक्षकाचे पद मंजूर केले आहे. परंतु, सद्यस्थितीत जिल्ह्यात औषध निरीक्षकच नसल्याने मेडिकलची नियमित तपासणी हाेत नसल्याची बाब पुढे आली आहे.
बॉक्स
हॉटेलातील बेस्ट बी फोर गायब
हॉटेल, बेकरी अशा अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या प्रतिष्ठाणांत बेस्ट बी फोर लिहिणे आवश्यक असल्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. या निर्देशानंतर फक्त १० ते १५ दिवस काही हॉटेलचालकांनी त्या पदार्थासमोर बेस्ट बी फोर लिहिले. परंतु, त्या प्रतिष्ठाणांची तपासणीच होत नसल्यामुळे हॉटेलचालकांनी बेस्ट बी फोर लिहिणेच बंद केले आहे.
कोट
हॉटेलची आम्ही तपासणी करतो. तपासणीत चुका आढळल्या तर त्यांना नोटीस देऊन कारण विचारले जाते. अनागोंदी कारभार असला किंवा भेसळ असली तर साहित्य जप्त करून कारवाई केली जाते. संशय आलेले पदार्थ सील करून प्रयोगशाळेत पाठविले जातात.
-देशपांडे अन्न निरीक्षक गोंदिया.
.......
लोकसंख्या: १४२८२३०
मेडिकल: ६००
हॉटेल्स: ४५०
औषध निरीक्षक:००
अन्न निरीक्षक: २
.......