अडीच वर्षांपासून सेवानिवृत्त परिचर पेन्शनसाठी मारतो चकरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 05:11 PM2024-11-14T17:11:13+5:302024-11-14T17:12:31+5:30
Gondia : आर्थिक अडचणीत सापडलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची कुणी घेणार का दखल?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग (गोंदिया) येथे कार्यरत परिचर सेवकपुरी ईश्वरपुरी मुलतानी हे ३० एप्रिल २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. परंतु अडीच वर्षे लोटूनही त्यांना पेन्शन देण्यात आली नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
सेवानिवृत्त परिचर मुलतानी हे येथील बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागातून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी पेन्शन प्रकरण तयार करून संबंधित लिपिकाकडे सादर केले होते. यासंदर्भात त्यांनी लिपिक, वरिष्ठ लिपिक व कार्यकारी अभियंता रा. गो. कुरेकार यांच्याकडे विनवणी केली. परंतु त्यांनी मुलतानी यांच्या पेन्शन प्रकरणाकडे लक्ष दिले नाही. एक-दोन नव्हे तर तब्बल ३० महिने लोटूनही त्यांना पेन्शन सुरू झाली नाही. पेन्शन कोणत्या कारणाने थांबलेली आहे.
यासंदर्भात मुलतानी विचारत असता त्यांना ते उत्तरही देत नाही. नागपूर येथील वेतन पडताळणी पथकाने घेतलेल्या आक्षेपाची पूर्तता केल्याचे संबंधित विभागाने सेवानिवृत्त परिचराला सांगितले. तरीही त्यांना पेन्शन सुरू झाली नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी मुलतानी यांनी केली आहे.
सावकाराकडून कर्ज घेऊन करावा लागतो औषधोपचार
मुलतानी यांना आपल्या कुटुंबाचे पालन पोषण व औषधोपचारासाठी सावकारांकडून कर्ज घेऊन आपले काम भागवावे लागत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या मुलतानी यांच्यावर कार्यकारी अभियंता कुरेकार व उपविभागीय अभियंता चंद्रकांत डोंगरे यांनी आत्महत्येची पाळी आणल्याचे ते म्हणाले.
त्या दोघांचे वेतन थांबवा
कार्यकारी अभियंता कुरेकार व उपविभागीय अभियंता डोंगरे या दोघांच्या हलगर्जीपणामुळे माझे ३० महिन्यांपासून पेन्शन प्रकरण अडकले आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी करून मला पेन्शन मिळत नाही तोवर, या दोघा अधिकाऱ्यांचे वेतन थांबविण्यात यावे अशी मागणी मुलतानी यांनी केली आहे.