बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 09:41 PM2019-05-15T21:41:35+5:302019-05-15T21:41:57+5:30
जिल्ह्यात नकली दारूचा महापूर वाहात आहे. या दारूवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ व १४ मे ला कारवाईचे धाडसत्र सुरू राबविले. १३ रोजी गोंदिया शहरातील बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड घातली. या दोन दिवस केलेल्या कारवाईत १२ लाख रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात नकली दारूचा महापूर वाहात आहे. या दारूवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ व १४ मे ला कारवाईचे धाडसत्र सुरू राबविले. १३ रोजी गोंदिया शहरातील बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड घातली. या दोन दिवस केलेल्या कारवाईत १२ लाख रूपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सरस्वती शिशू मंदिरजवळ बाजपेयी वार्ड पैनकटोली या ठिकाणी अवैधरित्या बनावट देशी दारू तयार केली जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली. या कारखान्यावर मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ काम करीत असल्याची माहिती मिळताच अतिरिक्त मनुष्यबळ मागविण्यात आले. संचालन अंमलबजावणी व दक्षता विभागीय उपायुक्त नागपूर यांच्या पूर्व परवानगीने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भंडारा व त्यांचा चमूची मदत घेऊन कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान त्या ठिकाणी स्पिरीट पाणी व अर्क यांचा वापर करुन बनावट देशी दारू बनवून ते देशी मद्याचे बनावट लेबल लावलेल्या बाटलीत भरून सिलबंद करण्याचे काम १७ व्यक्ती करीत असल्याचे आढळले. या कारखान्यात ११७५ ब.लि.स्पिरीट, ४५ पेट्या बनावट देशी दारू, ९० मिली क्षमतेच्या सुपर सॉनिक रॉकेट संत्रा या नावाने लेबल असलेल्या ३००० देशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, १० हजार बूच, २ बाटल्या अर्क, इलेक्ट्रिक मोटार, स्पिरीटच्या २०० लिटर क्षमतेचे १४ प्लॉस्टिक रिकामे ड्रम व ५५ पाण्याचे रिकामे कॅन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुद्देमालाची किंमत २ लाख ८२ हजार ९०० इतकी आहे. ही कारवाई १३ मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्राजक्ता लवंगारे वर्मा, सुनील चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे, शशीकांत गर्जे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक तानाजी कदम, संयुक्त भरारी पथक भंडारा-गोंदिया, निरिक्षक सेंगर, दुय्यम निरीक्षक बडवाईक, बोडेवार यांंनी केली. पुढील तपास निरीक्षक तानाजी कदम करीत आहेत.
१९ जणांवर गुन्हा दाखल
सदर गुन्ह्यामध्ये एकूण १९ आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर महाराष्टÑ दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ३५ (ए), (बी),(सी),(डी) (ई), (एफ), ८२, ८३ व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये आनंद राजेश नागपुरे (२१), राहूल गेंदेलाल ओमकारकर (२०), लतेश नरेंद्र लक्केवार (२३), करण केवल अंबादे (१९), तिरेन्द्र राधेलाल सोनवाने (१९), सोनू गणेश सोनवाने (२०),पवन ग्यानीराम सहारे (३०), संतोष परनू रहांगडाले (२८),मनोज अशोक शिवणकर (३८), नितेश रामू रॉय (३०), कमलेश प्रकाश धाकडे (१९), सागर विजय सोमलपुरे (२४), कपिल छेदेलाल लुयीया (२५), स्नेहिल युवराज हिरकणे (२१), तरुण राजेश टेंभूर्णे (१९), कुणाल विनोद धकाते (२०), सुरेश किशन मेश्राम (३३),पराग रमन अग्रवाल (२५) घनश्याम सुभाष हुड (३९) यांना अटक करण्यात आली. तर महेंद्रसिंग भुपेंद्रसिंग ठाकुर, सिंधू भाऊराव नंदागवळी, श्याम चाचेरे व इतर आरोपी फरार आहेत.
टेम्पोत आढळले नकली दारूचे १६० बॉक्स
१४ मे रोजी दुपारी ४.३० वाजता दरम्यान ९० मिलीचे १६० बॉक्स बनावट देशी दारुची वाहतूक करणारा एक टेम्पो सीजी ०४ जेए ६३२५ हे वाहन सेलटॅक्स कॉलनीत उभा असतांना त्याला ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.दारूची किंमत ४ लाख १० हजार तर वाहनाची किंमत ४ लाख रूपये सांगितली जाते. यात सुमारे ८ लाख १० हजाराचा माल जप्त करण्यात आला.सदरची बनावट दारु ही १३ मे रोजी पकडलेल्या अवैध कारखान्यामधून तयार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.