बनावट देशी दारुच्या कारखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:04 PM2019-07-12T23:04:04+5:302019-07-12T23:04:22+5:30
तालुक्याच्या पांढराबोडी येथील दीक्षीत यांच्या फार्म हाऊसमध्ये सुरु असलेल्या बनावट देशी दारु कारखान्यावर धाड घालून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १२ जुलै रोजी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्याच्या पांढराबोडी येथील दीक्षीत यांच्या फार्म हाऊसमध्ये सुरु असलेल्या बनावट देशी दारु कारखान्यावर धाड घालून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १२ जुलै रोजी करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनात गोंदियाचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रविण तांबे यांच्या नेतृत्वात निरीक्षक सुनील परडे व त्यांच्या चमूने बनावट देशी दारुच्या कारखान्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता धाड टाकली. यात शंभर लिटर स्पिरीट, १८० मिलीच्या ८८६ बनावट देशी दारुच्या बाटल्या, १८० मिली क्षमतेच्या फिरकी संत्रा नावाचे लेबल असलेल्या १७०० देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, ३ हजार ५०० बूच, एक बाटली अर्क, इलेक्ट्रीक मोटार, स्पिरीच्या वासाचे २०० लिटर क्षमतेचा एक व २० लिटर क्षमतेचे ५ प्लास्टिकचे रिकामे ड्रम, ४ पाण्याचे रिकामे कॅन असा ६० हजार ८३० रुपयाचा माल जप्त करण्यात आला.
याप्रकरणात सतीश नरेंद्रप्रसाद ढेकवार या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर धमेंद्र सिताराम हा फरार झाला आहे.गोंदिया जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात १९३ वारस गुन्हे नोंदविले आहे. २० वाहनांसह ६० लाख ८ हजार ८० रुपयाचा माल जप्त केला आहे.
सन २०१९-२० या आर्थिक वर्षात १७३ वारस गुन्ह्यांची नोंद केली असून तीन वाहनासह २३ लाख ७४ हजार ८९८ रुपयांचा माल जप्त केला आहे.