स्वच्छता अॅपसाठी सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:29 AM2018-08-29T00:29:01+5:302018-08-29T00:30:27+5:30
आपला जिल्हा स्वच्छतेत अव्वल ठरावा, यासाठी स्वच्छता अॅप डाऊनलोड करून त्यात पहिल्या क्रमांकाला वोट करण्याची मोहीम जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे सुरू आहे. मात्र वोट करण्याचा कालावधी कमी असल्याने या कामासाठी आता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जुंपण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपला जिल्हा स्वच्छतेत अव्वल ठरावा, यासाठी स्वच्छता अॅप डाऊनलोड करून त्यात पहिल्या क्रमांकाला वोट करण्याची मोहीम जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे सुरू आहे. मात्र वोट करण्याचा कालावधी कमी असल्याने या कामासाठी आता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जुंपण्यात आले आहे. यासाठी मंगळवारी (दि.२८) तिरोडा तालुक्यातील काही शाळांना दुपारी सुटी देण्यात आल्याची माहिती आहे.
साथीच्या आजाराचे मुळ हे अस्वच्छता आहे. गावातील अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. यामुळे उपचारासाठी औषधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. त्यामुळे लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व व त्याचे होणारे फायदे पटवून देत त्याची गावकऱ्यांनी गावात अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी एक स्वच्छता विषयक अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला रँक देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी हा अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन त्यात पहिल्या क्रमांकाला वोट करावे, याकरीता जिल्हा परिषदेतर्फे व्यापक जनजागृती केली जात आहे. यात काही चुकीचे नाही. मात्र हे अॅप आपल्या भागातील अधिकाधिक नागरिकांना डाऊनलोड करायला लावण्याची जबाबदारी आता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी मंगळवारी तिरोडा तालुक्यातील काही जि.प.शाळांना दुपारीच सुटी देण्यात आली. सुटीेनंतर शिक्षकांना गावात जाऊन नागरिकांना स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम देण्यात आले. या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये सुध्दा नाराजीचा सूर आहे.